पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेले स्मारक आणि साडे आठ फूट उंचीच्या भव्य पुतळ्याचे अनावरण टोकियोमध्ये करण्यात आले. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
आम्ही पुणेकर, जपान भारतीय महासंघ आणि एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन सोहळ्याच्या वेळी इंडो-जपान शिवस्वराज्य यात्रेचा समारोप झाला. यावेळी एदोगोवा कल्चरल सेंटरचे अध्यक्ष योगी पुराणिक आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, उपाध्यक्ष मिलिंद पवार, सल्लागार बिपिन थोरात, संतोष रासकर, उत्तम मांढरे, श्रीकांत बराटे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, विवेक खटावकर, बापू मेंगडे, दिलीप बराटे, जपान मधील आमदार, महापौर, जपानी रामायणकार यातसूही मातसुओ आदी मान्यवर उपस्थित होते. या शिल्पाची निर्मिती शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांनी केली आहे.
यानिमित्ताने चित्रफितीद्वारे आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर पोहचविण्यात स्मारकाच्या निमित्ताने मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि एमआयटी चे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी चित्रफितीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. जपान आणि भारत मातेच्या संस्कृतीमध्ये एक ध्येय आहे ते म्हणजे विश्वशांती आणि विश्व कल्याणाचे असे प्रतिपादन कराड यांनी या वेळी केले.
स्वामी श्री गोविंदगिरी महाराज म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे रोज स्मरण केल्याने जीवनात आपल्याला पुढे कसे जायचे आहे, याचा मार्ग आपोआप दिसू लागेल. समाजाला आणि देशाला पुढे न्यायचे असेल पुढच्या पिढीच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना करावी लागेल, तर आपोआप विश्वकल्याणाचा मार्ग खुला होईल.
अभिषेक साळी आणि नमिता साळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
.


