पुणे, दि.24 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) लँडस्केप विभागातर्फे (भूदृश्यरचनाशास्त्र वास्तूकला) या क्षेत्रातील तंत्रविषयक माहिती देणाऱ्या ‘टेक फेस्ट’ या तिसऱ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात या क्षेत्रासाठी लागणाऱ्या व्यावसायिक स्टॉल्सचे उद्घाटन प्रसिद्ध लॅण्डस्केप डिझायनर डॉ. महेश नामपूरकर यांनी केले.
या फेस्टिवलमध्ये इकोग्रीन लँडस्केप टेक्नोलॉजी इंडिया प्रा. लि. आणि आर्किटेक्टस् इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनने (एसा) यांनी ज्ञानात्मक भागिदार म्हणून सहभाग घेतला. या महोत्सवाची रूपरेषा बीएनसीएच्या लॅण्डस्केप विभागप्रमुख डॉ.स्वाती सहस्रबुद्धे यांनी तयार केली. स्टॉल्सच्या उद्घाटन समारंभात बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, ‘एसा’चे अध्यक्ष प्रा. महेश बांगड, इंडियन सोसायटी ऑफ लायटिंग इंजिनियर्सचे (आयएसएलई) हर्षा जोशी, पराग शिरोळे, वृक्ष लॅण्डस्केप संस्थेचे संजय वायचळ, विद्युत रोषणाई विक्रेते मुफद्दल, तसेच बीएनसीएच्या डॉ. शुभदा कमलापुरकर, प्रा. अनुपमा बापट आणि प्रा. मुक्ता गोखले कुलकर्णी उपस्थित इत्यादी मान्यवर होते.
यावेळी बोलताना डॉ. नामपूरकर म्हणाले की, लॅण्डस्केप आर्किटेक्चर हे क्षेत्र वेगाने वाढत असून येणाऱ्या प्रगतीशील भारतासाठी तसेच वैश्विक पातळीवरही एक उत्तम संधी निर्माण करणारे ठरणार आहे. त्याकडे तरुण लॅण्डस्केप आर्किटेक्ट्सनी लक्ष द्यायला हवे.
डॉ. कश्यप म्हणाले की, या महोत्सवात्ूान लॅण्डस्केप आर्किटेक्चरमधील विविध तांत्रिक शक्यतांचा वेध घेताना अद्ययावत तांत्रिक विकासाचा लाभ उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठीही करून देण्याची आमची यामागची भूमिका आहे. त्यातील तांत्रिक गोष्टींचा वापर, त्याचे ज्ञान विद्यार्थिनींना मिळतो आहे.
टेक फेस्ट मधील स्टॉल प्रदर्शनात आऊटडोअर लायटिंग, बागेसाठी लागणारे साहित्य, ग्रीन वॉल्स, विविध कलात्मक दगड, शिल्पे, कुंड, जलसंधारणाची उपकरणे, ऑर्किड नर्सरीमधून विविध प्रकारच्या पुष्पवनस्पती, तसेच पोहण्याचे तलाव व कारंजी यांच्यासाठी लागणारे साहित्य इत्यादींचा समावेश आहे. ‘टेक फेस्ट’मध्ये मृदारण्य संस्थेतर्फे माती व लिंबाचा वापरातून होणारे बांधकाम, तसेच कार्यक्षम जलसंधारण, पाण्याचे विविध आकृतीबंध आणि मोकळ्या जागेतील फर्निचर इत्यादी विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
महोत्सवात प्रदीप बारपांडे, तनुजा गोडसे, जलसंधारण सल्लागार मुकुंद सखदेव, विद्युत रोषणाई सल्लागार अभिजित साळुंके, प्रकल्प अंमलबजावणी तज्ज्ञ संजय वायचळ, स्पेक्ट्रम लायटिंग सल्लागार विशाल भोसले, ग्रीन वॉल व ग्रीन रूफ तज्ज्ञ अनुराधा बारपांडे, पर्यायी साधनसामुग्री तज्ज्ञ मुग्धा जोशी, विविध दगड व वास्तूतज्ज्ञ आर्किटेक्ट आशिश व भैरवी सचदे आणि कारंजी व पाणवठे विषयक सल्लागार प्रवीण जोशी यांनी यांनी मार्गदर्शन केले.


