पुणे, 24 मार्च 2025 : मानसिक,नैतिक आधार आणि माहितीच्या स्त्रोताशिवाय संशोधन, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव पाडण्यात रूग्ण सहाय्यक गटांची अधिक व्यापक भूमिका गरजेची आहे,असे मत इंडियन ऱ्हुमॅटॉलॉजी असोसिएशन (आयआरए) चे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर एस यांनी व्यक्त केले.2000 साली स्थापन झालेल्या,आर्थरायटिस व ऱ्हुमॅटिझम रूग्णांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी आधार व समर्थन गट ’मिशन आर्थरायटिस इंडिया’ (माई) तर्फे आयोजित नॅशनल पेशंटस् कंव्हेंशन मध्ये ते बोलत होते.
नुकतेच हॉटेल रामी ग्रँड येथे नॅशनल पेशंटस् कंव्हेंशन चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन ऱ्हुमॅटॉलॉजी असोसिएशन (आयआरए) चे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर एस आणि सन्माननीय अतिथी म्हणून दिल्ली येथील वरिष्ठ ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ.किरण सेठ,भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटलच्या ऱ्हुमॅटॉलॉजी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.कविता कृष्णा,संचेती हेल्थ केअर ॲकडेमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी, तसेच सेंटर फॉर ऱ्हुमॅटिक डिसीजेस,पुणे चे संचालक व मुख्य ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. अरविंद चोप्रा, माईच्या संस्थापक सदस्य व विश्वस्त शरयू भट, माईच्या अध्यक्ष दीपा मेहता,सचिव श्वेता कुलकर्णी आणि खजिनदार शिवानी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेत 100 हून अधिक रूग्ण आणि 15 ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट उपस्थित होते,यां सर्वांनी ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या विविध पैलूंबाबत चर्चा केली.
डॉ.चंद्रशेखर एस म्हणाले की,ऑटोइम्युन आर्थ्रारायटिस असलेल्या रूग्णांकडे पाहण्याचा तसेच व्यवस्थापन व उपचार करण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.आता आपल्याकडे 40 ते 50 हून अधिक औषधांचा पर्याय आहे.कोणते औषध द्यायचे,कधी द्यायचे,किती द्यायचे यावर बरेच संशोधन सुरू आहे. म्हणून याबाबत मार्गदर्शन महत्त्वाची बाब आहे.हा आजार मुळात गुंतागुंतीचा आहे आणि वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो,म्हणूनच नैतिक आधार आणि माहितीचे स्त्रोत व्यतिरिक्त रूग्ण सहाय्यक गटांनी अधिक भूमिका बजावणे गरजेचे आहे.डॉ.चंद्रशेखर यांनी दोन क्षेत्रांकडे लक्ष वेधले.त्यात पहिले म्हणजे विविध गट,संस्था व संघटना एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रासाठी संशोधन निधी उभा करू शकतात आणि यामुळे संधिवाताचे व्यवस्थापन आणि उपचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.दुसरे म्हणजे पाश्चिमात्य देशांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की,मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या दृष्टीने भाग होण्यासाठी रूग्ण सहाय्यक गटांनी आग्रही राहावे.त्याचबरोबर सरकार व इतर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या विभागांसमोर विमा सारख्या विविध समस्या मांडण्यात भूमिका बजावली पाहिजे.
रूग्णांना संबोधित करताना डॉ.चंद्रशेखर म्हणाले की,संधिवाता बरोबर समस्या येत राहतील,पण आपला जगण्यातला उत्साह कायम राहिला पाहिजे.जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा पडणे अटळ असते,पडलो तरी पुन्हा उठून चालायला सुरूवात केली पाहिजे.जेव्हा आपण या दृष्टीकोनातून पाहतो,तेव्हा परिस्थिती बदलते.
दिल्ली येथील वरिष्ठ ऱ्हयुमॅटॉलॉजिस्ट डॉ.किरण सेठ म्हणाल्या की,प्रत्येक मानवामध्ये या आजाराशी लढण्याची शक्ती असतेच,परंतु इतरांनाही लढण्यास प्रेरित करू शकेल असे वातावरण निर्माण करण्याची देखील क्षमता असते.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटलच्या ऱ्हुमॅटॉलॉजी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.कविता कृष्णा म्हणाल्या की,संधिवात विशेष करून ऑटोइम्युन आर्थरायटिस महिलांमध्ये जास्त दिसून येतो.योग्य निदान आणि उपचारांबरोबरच वजन आटोक्यात ठेवणे,व्यायाम,आहार,ध्यानधारणा याचा फायदा होतो.
संचेती हेल्थ केअर ॲकडेमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी म्हणाल्या की, संधिवातामुळे समस्या निर्माण होऊ शकतात,आपली गती मंदावू शकते पण माणसाची इच्छाशक्ती यापेक्षा कैकपट जास्त असते.
या परिषदेत पुण्यातील ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ.वैजयंती लागू-जोशी यांना कै.श्री.पी.सी. नहार ’व्याख्यान पुरस्कार’, वाचस्मृता,लुपस इंडिया,कोची यांना हरिनारायण राठीजी ’वात विरुद्ध योद्धा’ पुरस्कार आणि सेंटर फॉर ऱ्हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) तर्फे ’वात विरुद्ध योद्धा’ पुरस्कार पुण्यातील शलाका बुरांडे यांना प्रदान करण्यात आला.
माईच्या अध्यक्ष दीपा मेहता म्हणाल्या की, यावर्षी आम्ही माई चे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत,त्यामुळे आमच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. नामवंत डॉक्टरांकडून आर्थरायटिस बद्दल सखोल माहिती प्राप्त मिळणारी ही परिषद रूग्णांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.तसेच हा गट भावनिक आधार,समंजस वातावरण आणि परस्पर अनुभव शेअर करण्यासाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करून देतो.त्यामुळे रूग्णांना आपली एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होते आणि ते अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात.
सेंटर फॉर ऱ्हुमॅटिक डिसीजेस,पुणे चे संचालक व मुख्य ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ अरविंद चोप्रा म्हणाले की,सांधे आणि हाडांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर्स आणि रूग्णांमध्ये एक पूल बांधण्याची गरज होती.त्यामुळेच माई सारखी संस्था उदयास आली. जागरूकता,ज्ञान आणि सक्षमीकरण हे माई च्या कार्याचे मुख्य स्तंभ आहेत.
‘मिशन आर्थरायटिस इंडिया’ या संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ अरविंद चोप्रा, शरयू भट, शिवानी बर्वे आणि श्री नरेंद्र भट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन अध्यक्षा दीपा मेहता यांनी उचित सत्कार केला.
माईच्या सचिव श्वेता कुलकर्णी यांनी उपस्थितां
चे स्वागत केले.


