गझलनवाज भीमराव पांचाळ
यांच्यावर देवेंद्र भुजबळ यांनी ३० वर्षांपूर्वी लिहिलेला लेख आजची एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर आजच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू पडतो हे आपल्याला कळेल. आज भीमराव पांचाळे यांच्या वाढ दिवसानिमित्त हा लेख पुढे देत
आहोत.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांची आणि माझी पहिली भेट झाली ,त्यावेळी मी दूरदर्शन केंद्रात नुकताच नोकरीस लागलो होतो आणि निर्माते
श्री सुधीर पाटणकर यांच्याबरोबर काम करीत होतो. तेव्हा दहा मिनिटे अवधीचा “सुगम संगीत” हा कार्यक्रम आम्ही करत असू.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी भीमरावांशी भेट झाली आणि प्रथम भेटीतच आमचे सूर जमले, ते आजतागायत. मला आलेला हा अनुभव भीमरावांना भेटणाऱ्या प्रत्येकाचाच असेल,यात मला तरी काही शंका वाटत नाही.
असे काय वैशिष्ट्य आहे भीमरावांमध्ये, जे दुसऱ्याना आपलेसे करून टाकते ? याचा जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा हा थोर कलाकार, माणूस म्हणून खरोखरच किती मोठा आहे,
हे जाणवते.वस्तुतः गायन काय, लेखन काय, किंवा इतर कुठलाही कला प्रकार साध्य करण्यासाठी लागणारे गुण, कला ही निसर्गदत्त असावी लागते. माणसाच्या परिश्रमामुळे नैसर्गिक गुणांना एक आकार, वळण लागण्यास निश्चितच हातभार लागतो. पण निसर्गाची देणगीच नसेल तर केवळ परिश्रमाच्या जोरावर कुणी काही बनू शकतो, असे निदान मला तरी वाटत नाही. पण आपल्याला मिळालेली ही देणगी निसर्गाची असून, आपण केवळ एक वाहक आहोत. निसर्गाने जे काही आपल्याला दिले आहे, ते इतरांना देण्यासाठी, त्यांचं जीवन आनंदित, सुसह्य करण्यासाठी आहे, अशी एक विनम्रतेची, विनयशीलतेची भीमरावांची भावना आहे. आपण जे काही झालो आहोत, त्याचा अजिबात गर्व किंवा अहंकार न बाळगता मी ही तुमच्यासारखाच आहे, तुमच्यातलाच एक आहे असंच भीमराव नेहमी वागताना मी पाहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गझल गायक म्हणून भीमराव यांना नावलौकिक मिळाला आहे. त्यांच्या गझल गायनाविषयी लिहिण्याइतपत मी काही जाणकार नाही, याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे माझ्या मर्यादेत मी राहणेच उचित ठरेल. त्यांच्या गझल गायनाविषयी, शैलीविषयी, योगदानाविषयी लिहिण्याचा अधिकार जाणकारांचा आहे. या विषयी ते लिहितही असतात, पुढेही लिहितील.
पण मी भीमरावांच्या केवळ गायनाच्या मोहिनीमुळे नव्हे तर त्यांच्या सहज सुंदर वागण्यामुळे, मिश्किल स्वभावामुळे त्यांच्याकडे आकृष्ट झालो, हे नमूद केले पाहिजे. कलाकारांविषयी बरेच समज, गैरसमज, प्रवाद असतात. त्यांचे मूडस् आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना बऱ्याचदा त्यांच्या कळत, नकळत व्यक्त होत असते, जी ते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये अंतर निर्माण करत असते.पण यशाची, कीर्तिची शिखरं पादाक्रांत करीत असतानाही आपले पाय जमिनीवरच राहू देणारे कलाकार फार दुर्मीळ आहेत हे खरे.
खरे म्हणजे कलाकारच काय, पण इतरही तथाकथित यशस्वी झालेल्या सरकारी कार्यालयात, बँकेत वा इतरत्रही अधिकारी,कर्मचारी वा शिपायाच्या जागेवर बसलेल्या व्यक्तीही इतरांशी ज्या तोऱ्यात, उद्धटपणे, मग्रुरीने वागतात, बोलतात ,ती त्यांची अशी वागणूक सततच आपल्या सामाजिक सभ्यतेच्या आड येत असते. एकीकडे प्राचीन संस्कृतीचे गोडवे गायचे, तर दुसरीकडे इतरांबरोबर तुच्छतेचा व्यवहार करायचा हा एक दुटप्पीपणा आपल्याकडे बहुतेक क्षेत्रात आढळत असतो. पावलोपावली आपण ठेचाळत राहतो .
म्हणूनच अशा या असंस्कृत वातावरणात भीमरावांसारख्या व्यक्ती मला मोठ्या वाटू लागतात. केवळ परिचितांशी नव्हे तर, अपरिचितांशीही ते सहज स्नेहाने, आपुलकीने वागतात, बोलतात, इतरांचा एक माणूस म्हणून मान ठेवतात आणि खरोखरच एका अकृत्रिम धाग्याने त्याला जोडतात.
वस्तुतः प्रत्येक मोठा माणूस आपले ट्रेड ‘सिक्रेट’, सिक्रेट राहील याकडे सातत्याने लक्ष देतो आणि निदान स्वतः उमेदीत असताना तरी आपली कला इतरांना शिकवायच्या फंदात पडत नाही. पडलाच तर आपल्या करिअरच्या शेवटी पडतो, जेणेकरून निदान त्याला तरी कुणी स्पर्धक निर्माण होऊ नये म्हणून. पण भीमराव असे त्यांनी कारकिर्दीच्या मध्यावरच गझल कार्यशाळा सुरू केल्या, जेणे करून गझल गायनात आणि लेखनात नवनवे लोक येत राहतील, त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल,यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठान स्थापन केले असून,त्या मार्फत ते विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असतात, असे त्यांचे मोठेपण आहे.
भीमरावांविषयी अनेक आठवणी आहेत. त्या परत परत आठवण्यासारख्याच आहेत. त्यामुळे किती लिहू आणि किती नको असे जरी होत असले तरी कुठे तरी थांबणे भागच आहे.पण जाता जाता त्यांना एकच विनंती आहे की, गायनाविषयीच्या,
लेखनाविषयीच्या कार्यशाळा घेण्याबरोबरच त्यांनी समाजात माणसांनी एकमेकांशी कसे वागावे,कसे बोलावे या विषयीच्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. आपल्या समाजाला आज अशा कार्यशाळांची फार फार गरज आहे.
लेखन:देवेंद्र भुजबळ
माजी दूरदर्शन निर्माता,
निवृत्त माहिती संचालक
नवी मुंबई.
९८६९४८४८००.


