जेष्ठ विधिज्ञ व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते ऍड. सोहनलाल कुंदनमल तथा एस. के. जैन यांचे नुकतेच वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात एस. के. जैन वाढले असल्यामुळे वकिली करत असतानाही त्यांनी सामाजिक भान जोपासले आहे. खडकी परिसरातील कामगारांच्या मुलांसाठी विविध शैक्षणिक सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. आपल्या बत्तीस वर्षाच्या खडकी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत संस्थेचा वटवृक्ष फोफावला. गेली १० वर्षे शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शि. प्र. मंडळीची परंपरा वृद्धिंगत केली आहे.
पुण्यातील झोपडपट्टीतील मुलांना सर्व प्रकारचे लसीकरण मोफत व नियमितपणे करण्यासाठी निरामय या संस्थेची स्थापना करून हजारो बालकांचे लसीकरण केले आहे. अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाचा पुणेकरांच्या वतीने सन्मान करण्यासाठी ऍड. एस. के. जैन अमृत महोत्सव समारंभ समितीने पुढाकार घेतला.
शनिवार दिनांक. ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऍड. एस. के. जैन यांचा सत्कार समारंभ सी.ओ.ई.पी. शिवाजीनगर, मुख्य सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ व महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित राहाणार आहेत.
रा. स्व. संघाचे महानगर संघचालक मा. रविद्रंजी वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास पुणेकर, शिक्षणप्रेमी व एस. के. जैन स्नेहींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शि.प्र.मंडळीचे उपाध्यक्ष मा. गजेंद्र पवार, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक मा. राजेश पांडे व सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी केले आहे.


