Saturday, November 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाऊंड अँड लाईट शो मधून उलगडला 'साल्हेरचा चित्तथरारक रणसंग्राम'*  इतिहास प्रेमी...

साऊंड अँड लाईट शो मधून उलगडला ‘साल्हेरचा चित्तथरारक रणसंग्राम’*  इतिहास प्रेमी मंडळ तर्फे आयोजन ; मराठ्यांची युद्धनीती, गनिमी काव्याचा प्रभावी वापर आणि शौर्य यांचे दर्शन

 

 

पुणे : महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या दुर्गांपैकी एक असलेल्या साल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व उलगडण्यासोबतच मराठयांचा चित्तथरारक इतिहास अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. सन १६७२ मध्ये साल्हेरच्या लढाईत मराठ्यांनी मोगलांचा केलेला पराभव ही विशेष महत्त्वाची घटना आहे. या ऐतिहासिक रणसंग्रामाची शौर्यगाथा आता भव्य दुर्ग प्रतिकृती, मावळ्यांच्या मूर्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

 

इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने ‘साल्हेरचा रणसंग्राम’ या भव्य दुर्ग प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, बुद्धीबळपटु जयंत गोखले, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन चे मुकुल मारणे उपस्थित होते. याप्रसंगी प्राज भिलारे व माऊली आहेर या युवा शिवव्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत हे दुर्ग प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

 

गनिमी कावा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जागतिक युद्धशास्त्राला दिलेली देणगी आहे, असे शशिकांत पित्रे यांनी सांगितले.

 

मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी गाजविलेल्या पराक्रमाच्या अनेक शौर्यगाथा इतिहासात नोंदल्या आहेत. साल्हेरच्या लढाईत सरनौबत प्रतापराव गुजर आणि पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्याचा पराभव केला. या लढाईत मराठ्यांनी दाखविलेली युद्धनीती, गनिमी काव्याचा प्रभावी वापर आणि शौर्य यांचे दर्शन प्रदर्शनातून घडणार आहे.

 

तब्बल ३० फूट लांबीच्या भव्य प्रतिकृतीसह शेकडो मावळ्यांच्या मूर्ती हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून साल्हेरच्या रणसंग्रामाचा इतिहास उलगडला जाणार आहे. सुमारे अर्ध्या तासाच्या साऊंड अँड लाईट शोमधून प्रेक्षकांना त्या काळातील युद्धाचा चित्तथरारक अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन १५ नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments