नवी दिल्ली, 7 एप्रिल 2025 – नॅशनल स्कील डेव्हलपममेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) नाशिक जिल्हा परिषद आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहयोगाने संपन्न घर अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. हा एक ग्रामीण गृहनिर्माण उपक्रम असून दीड लाख कुटुंबांना प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण या योजनेअंतर्गत त्यांची घरे बांधण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.
या समुदायआधारित उपक्रमामध्ये 18 व्यावसायिक संघटना आणि तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. घर मिळवण्याच्या हक्काला कौशल्य प्रशिक्षणाची जोड देण्याचा त्यांचा समान दृष्टिकोन आहे. या उपक्रमातून कुटुंबांना घर उभारण्यासाठी मदत मिळेलच, त्याचप्रमाणे स्वतःच्या हातांनी ते घर बांधण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यामुळे उपजीविका आणि आत्मनिर्भरता यात एक मजबूत नाते तयार होणार आहे.
प्रशिक्षणाची शैक्षणिक रूपरेषा ठरवण्याचे काम आणि गावागावांत प्रमाणित प्रशिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची जबाबदारी एनएसडीसीकडे असणार आहे. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे प्रत्यक्ष क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षणाचे नेतृत्व करण्यात येईल, जे लाभार्थ्यांना सुरक्षित, कार्यक्षम आणि किफायतशीर बांधकाम कौशल्यांची तयारी प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे करून देतील. एनएसडीसीसाठी ही भागीदारी म्हणजे केवळ उपजीविकेची साधने निर्माण करणे नव्हे, तर संपूर्ण समुदायाचे रूपांतर घडवण्याच्या त्यांच्या व्यापक उद्दिष्टाचे प्रतिबिंब आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती आशिमा मित्तल या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत.
श्री. कुणाल पाटील (अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो) आणि श्री. सचिन गुळवे (उपाध्यक्ष, नाशिक सिटिझन फोरम) हे तांत्रिक आणि सामुदायिक संस्थांमध्ये समन्वय साधत आहेत. स्थानिक आर्किटेक्ट्स ग्रामीण गरजांनुसार कार्यक्षम आणि वापरण्यास सोपे घरांचे आराखडे तयार करण्यात आपले योगदान देत आहेत.
बांधकाम, सौर ऊर्जा, प्लंबिंग, स्वच्छता आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांचे विस्तृत जाळे या उपक्रमासाठी एकत्र आले आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये फॅक्टरी रेटने बांधकाम साहित्य उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सहकार्याने सौर ऊर्जेवर आधारित उपाययोजनांना प्रोत्साहन देणे आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या भागीदारीने कमी खर्चाची स्वच्छता यंत्रणा डिझाइन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
मराठा एज्युकेशन ट्रस्ट, मराठा विद्या प्रसारक समाज आणि के. के. वाघ यांसारख्या स्थानिक शैक्षणिक संस्थांचाही या उपक्रमात सहभाग असेल. ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि नाशिक जिल्हा परिषदेतील ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स यांच्यासोबत या संस्थांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक अंमलबजावणीत मदत करतील. हे सर्व मिळून कुटुंबांना घर बांधण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतील; तसेच शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठीही सहाय्य करतील.
या आठवड्यात प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याला अंतिम रूप देण्यात येत आहे आणि पुढील पंधरवड्याच्या आत या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. स्थानिक सहभाग आणि कौशल्याधारित दृष्टिकोन यामुळे ‘सम्पन्न घर अभियान’ ग्रामीण भागातील गृहनिर्माणासाठी देशपातळीवर एक आदर्श मॉडेल ठरू शकते.
क्वालिटी सिटी नाशिकचे संयोजक जितेंद्र ठाक्कर यांनी श्रीमती अशिमा मित्तल यांचे त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वासाठी आभार मानले. प्रत्येक वीट रचून आणि प्रत्येक कौशल्याच्या माध्यमातून आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात या उपक्रमाचे यश आहे, असे ते म्हणाले.


