पुणे, दि. १४ : येत्या 18 एप्रिल रोजी येणाऱ्या जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनतील (बीएनसीए) संस्कृती अध्ययन केंद्र तसेच वारसा इतिहास संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन देवालयांची वास्तूरचना: लिखित माहिती व प्रत्यक्ष वापर’ यावर पाच दिवसांच्या ऑनलाईन अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध स्थपती के. पी. उमापती आचार्य हे या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक असून 21 ते 24 एप्रिल दरम्यान या विषयावर माहिती सांगणार आहेत.
के. पी. उमापती हे तामिळनाडूतील कुंभकोणम येथील इन्स्टिट्यूट ऑफ सॅक्रीड आर्किटेक्चरचे संचालक आहेत. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून होत असणाऱ्या या अभ्यासक्रमाचा लाभ वास्तूरचनाशास्त्रातील (आर्किटेक्चर) विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना होणार आहे. डॉ. कश्यप म्हणाले की, वास्तूरचना शास्त्राची आश्चर्य ठरणारी भारतीय मंदिरे ज्या तत्त्वज्ञानावर व भूमितीय तत्त्वावर आधारित आहेत, त्या तत्त्वांची तोंडओळख या अभ्यासक्रमात केली जाणार आहे.
यासंबंधी माहिती देताना बीएनसीएच्या संस्कृती अध्ययन केंद्रप्रमूख डॉ. वैशाली लाटकर म्हणाल्या की, देवालयाच्या बांधकाम नियोजनाबाबत आजच्या तरुण वास्तूरचनाकारांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठीच या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. तसेच ऐतिहासिक वारसा क्षेत्रात त्याचा वापर करताना, तो वारसा जपताना आणि त्यासंबंधीच्या वास्तूरचनेतील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा पुढील काळात अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी ठरेल. या अभ्यासक्रमात देवालय बांधकामाच्या संकल्पना, त्यासाठी देवालय वास्तूरचना विकासाची प्रक्रिया, देवालय वास्तू रचनेची विविध अंगे, प्रतिमा शास्त्राची मूलतत्त्वे इत्यादी विषयांचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमासाठी https://forms.gle/r1SF3Zb4KzRrNiYQ9 या गुगल लिंकवर जाता येईल तसेच वास्तूरचनाकार नीरज गोडसे यांना +91 9175917553 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.
—


