पुणे – विमानतळावर स्वस्त दरातील उडान यात्री कॅफे सुरु करणेबाबत…विमानतळावरील प्रतीक्षा काळ कमी करणे बाबत… केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध योजनांची आखणी करत असतात. त्यांच्या ह्या दृष्टिकोणामुळेच ते कमालीचे लोकप्रिय आहेत हे आपण जाणताच.
विमानप्रवास हा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात यावा यासाठी च्या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र विमानतळावर मिळणारे खाद्य पदार्थ मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आज पुणे ते हैद्राबाद ह्या विमानप्रवासात ते प्रकर्षाने जाणवले. पुणे विमानतळावर वडापाव 120 रुपये, सामोसा 130 रुपये तर ब्रेड पॅटिस 150 रुपये ह्या हवाई दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चहा तर 200 रुपये च्या घरात आहे. ब्रँडेड दुकानामध्ये तर दर गगनाला भिडलेलेच आहेत. अगदी चितळेची बाकरवडी 800 रुपये किलो तर लक्ष्मीनारायण चिवडा 900 रुपये किलो ने उपलब्ध होता.
आपण नुकतेच कोलकाता विमानतळावरील उडान कॉफी शॉप ला भेट दिली होती जेथे स्वस्त दरात चहा,कॉफी, पाणी व इतर पदार्थ उपलब्ध आहेत. याच धर्तीवर सर्वच विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरु केल्यास सामान्य प्रवासी आपणास दुवा देतील. किमान आपले गृहनगर पुणे येथून ही सुविधा त्वरित सुरु करावी ही विनंती.
तसेच प्रवाश्यांना विनाकारण तीन तीन तास आधीच विमानतळावर येण्यास सांगितलं जातं.त्यासाठी घरून विमानतळापर्यंतचा एक तास प्रवासाचा धरला तर अवघ्या अर्धा तास, किंवा 50 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास प्रतीक्षा करावी लागते. हा कालावधी कमी करता आला तर योग्य होईल. त्यासाठी अधिकचे बॅगेज चेक इन कॉऊंटर व सुरक्षा तपासणी कॉऊंटर केल्यास लांबलचक रांगा व उड्डाणापूर्वीचा प्रतीक्षा कालावधी कमी करता येईल.
आपण वरील सूचनांचा ग्राहकांच्या दृष्टीने विचार करून योग्य कार्यवाही कराल अशी खात्री वाटते.


