पुणे,6 फेब्रुवारी 2024 : एखाद्या व्यक्तीला अनुभवता येणार्या सर्व संवेदनांपैकी वेदना ही सर्वांत कठिण संवेदना असते. या वेदनांपासून मुक्तता देण्याचे महत्त्वाचे काम वेदना व्यवस्थापन तज्ञ करत असतात.त्यामुळे वेदना व्यवस्थापन ही शाखा अत्यंत महत्त्वाची असून याला वैधानिक संस्थेकडून सुपर स्पेशालिटी दर्जा मिळायला हवा,असे मत प्रसिध्द शल्यचिकित्सक आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे सदस्य डॉ.शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले. सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन पुणे (एसएसपीपी) तर्फे इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,आयएसएसपीकॉन २०२४ च्या 38व्या राष्ट्रीय परिषदेचे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यातील विमाननगर येथील हयात रिजन्सी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रख्यात प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉ.वृषाली किन्हाळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यांसह इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन (आयएसएसपी) चे अध्यक्ष मुरलीधर जोशी, उपाध्यक्ष डॉ.कृष्णा पोतदार, सचिव डॉ.प्रवेश कंथेड, खजिनदार हितेश पटेल, यांसह आयएसएसपीकॉन २०२४ या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.उत्तम सिधये, सचिव डॉ.वर्षाली केनिया, खजिनदार डॉ.प्रज्ञा भालेराव, वैज्ञानिक कार्यक्रमांच्या अध्यक्ष डॉ.माधुरी लोकापूर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आयएसएसपीकॉनच्या स्मरणिकेचे तसेच इंडियन जर्नल ऑफ पेन च्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शिवकुमार उत्तुरे म्हणाले की, जेव्हा आम्ही रूग्णाला शस्त्रक्रियेचा सल्ला देतो,तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हा शस्त्रक्रियेच्या नंतरच्या वेदनांबाबत असतो.वेदना तज्ञांमुळे अशा रूग्णांचे आयुष्य आणि भविष्य अधिक सुकर होते. ही शाखा एक सुपर स्पेशालिटी असून वैधानिक संस्थेतर्फे तशा प्रकारचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. आयसीयू मध्ये दाखल होण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे उदाहरण देत ते म्हणाले की,आपण सक्रीय होण्याची वेळ आली आहे.आपण स्वत: प्रोटोकॉल तयार करून केंद्राकडे सादर करावेत.हे प्रत्येक वैद्यकीय शाखेने केले पाहिजे.
विशेष अतिथी व प्रख्यात सत्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ.वृषाली किन्हाळकर म्हणाल्या की,महिला आणि वेदनेचे एक प्रकारे नाते आहे,जे प्रसूतीच्या काळात दिसते.प्रत्येक निर्मितीच्या मुळाशी वेदना असते,त्यामुळे माणसाच्या मनात वेदनेचे प्रचंड महत्त्व आहे.
आयएसएसपीचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर जोशी म्हणाले की,आयएसएसपीचे 13 राज्यस्तरीय व 18 शहरी शाखा आहेत आणि 3000 हून अधिक सदस्य आहेत. यंदा आयएसएसपी आपल्या स्थापनेची 40 वर्षे पूर्ण करत आहे.
आयएसएसपीचे सचिव डॉ.प्रवेश कांथेड म्हणाले की,आयएसएसपी ही पेन फिजियन्सची सर्वांत मोठी संघटना आहे.या शाखेला सुपर स्पेशालिटी दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
आयएसएसपीकॉन २०२४ या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.उत्तम सिधये म्हणाले की, आयएसएसपीकॉन २०२४ या परिषदेचे उद्दिष्ट डॉक्टरांना ‘वेदना व्यवस्थापन’ कडे सर्वांगीण दृष्टिकोन व नवीनतम प्रगतीसह सुसज्ज करणे हा आहे.
डॉ.पराग मुनोत आणि डॉ.मेधा फडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.वर्षाली केनिया यांनी आभार मानले.
या परिषदेत पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन) संबंधित विविध विषयांवर चर्चासत्र, बीज भाषण कार्यशाळा, वैज्ञानिक कार्यक्रमांसह पोस्टर प्रेझेंटेशन यांचा समावेश होता