‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना’अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूलला महापालिका व खासगी शाळा गटात राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकाचे तब्बल 21 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
शाळेच्या यशाचे कौतुक करण्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेतून 1970 साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यावेळच्या शिक्षकांनी ही आगळी वेगळी भेट शाळेला दिली. त्यासाठी 4 लाख 65 हजार रुपयांचा निधी उभा केला.
इंग्रजीचे मो. रा. फाटक, हिंदीच्या ललिता गुप्ते व पेठकर मॅडम, गणिताचे ठाकूर देसाई आणि चित्रकलेचे वारे सर या नव्वदीतील शिक्षकांसह देश-विदेशातील सत्तरीच्या उंबरठ्यावरील 50 विद्यार्थ्यांनी या सुविधेसाठी खारीचा वाटा उचलला. किरण शाळिग्राम आणि दिलीप परदेशी या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय शिक्षण देण्याचा उद्देशाने लोकमान्य टिळकांनी 1980 मध्ये ही शाळा सुरू केली. सन 1954 मध्ये सुरू झालेले ‘तारांगण’ ही शाळेची वेगळी ओळख. इथे शंभर व्यक्तींची बसण्याची सोय असून, कृत्रिम आकाश निर्माण करून ग्रह, तारे, तारकासमूह यासंबंधीची माहिती दिली जाते. शहर आणि परिसरातील शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी शैक्षणिक सहलीसाठी येतात.
कृत्रिम तारांगण गोल घुमटामध्ये तयार केल्याने प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा भास होतो. बंदिस्त तारांगणात हवा खेळती राहावी यासाठी पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु पंख्यांचा आवाज घुमत असल्याने स्पष्ट उच्चार ऐकण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली.
आज ही यंत्रणा शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, मुख्याध्यापिका सुनीता राव, तारांगण प्रकल्पाचे प्रमुख विनायक रामदासी, अमित कुलकर्णी, विकास पढेर, आशा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


