Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय आरोग्यसेवेत इमोशन एआयचा नवा अध्याय : एमयूएचएस आणि निहिलेंटच्या इमोस्केप प्लॅटफॉर्मची...

भारतीय आरोग्यसेवेत इमोशन एआयचा नवा अध्याय : एमयूएचएस आणि निहिलेंटच्या इमोस्केप प्लॅटफॉर्मची क्रांतिकारी भागीदारी

भारतीय पारंपरिक ज्ञान आणि आघाडीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सांगड घालून मुख्य प्रवाहातील वैद्यकीय क्षेत्रात भावनिक आरोग्याला नवा आयाम देणे, हे भागीदारीचे उद्दिष्ट आहे~
मुंबई/नाशिक, 15 मे 2025 : संपूर्ण आरोग्यसेवेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणारे पाऊल टाकत देशातील 600 हून अधिक वैद्यकीय, दंत, आयुर्वेद आणि संबंधित आरोग्य संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस), नाशिक येथील शैक्षणिक विभागातर्फे निहिलेंट या कंपनीसोबत औपचारिक भागीदारी केली आहे. या कराराअंतर्गत निहिलेंटच्या इमोस्केप या नाविन्यपूर्ण एआय-आधारित इमोशन डिटेक्शन प्लॅटफॉर्मची वैद्यकीय उपयुक्तता तपासण्यात येणार आहे. ही भागीदारी हा भारतीय आरोग्यसेवेच्या क्षेत्रात परिवर्तन घडवणारा टप्पा ठरणार आहे. नवरस (नऊ प्रकारच्या भावना) ही प्राचीन भारतीय संकल्पना आणि आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांची सांगड घालत या भागीदारीद्वारे निदान, उपचार आणि रुग्णसेवेमध्ये भावनिक आरोग्याचा समावेश करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याची दिशा ठरविण्यात येत आहे.
इमोस्केप हे आघाडीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून खांद्याच्या वरच्या भागातील सूक्ष्म हालचाली थ्रीडी स्वरूपात टिपून प्रेम, आनंद, करुणा, राग, धैर्य, भीती, घृणा, विस्मय आणि शांतता या मानवी मनातील नऊ मूळ भावना ओळखू शकते. भारतीय नाट्यशास्त्रात शतकानुशतके महत्त्वाचे स्थान असलेल्या ‘नवरस’ या प्राचीन भावनाशास्त्रावर आधारित इमोस्केप प्लॅटफॉर्म ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे. भावनांविषयक प्राचीन समज आणि अत्याधुनिक एआय यांचा मेळ साधत हे तंत्रज्ञान रुग्णाच्या भावनिक स्थितीचा रिअल-टाइम अंदाज देऊ शकते. यामुळे अधिक वैयक्तिक आणि परिणामकारक उपचारपद्धतीसाठी नवे मार्ग खुले होतात.
या भागीदारीचा भारतीय आरोग्यसेवेच्या भविष्यावर होणारा सखोल परिणाम स्पष्ट करताना. एमयूएचएसच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर म्हणाल्या, “मन आणि शरीर वेगळे करता येत नाहीत. आरोग्यसेवा ही समग्र असली पाहिजे. हे केवळ संशोधन नाही, ही एक क्रांती आहे. नवरसासारख्या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या भावनिक संकल्पनेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, आपण भावनिक आरोग्य समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रभावीपणे काम करण्यासाठी नवी दालने खुली करत आहोत. आमचे विद्यार्थी, संशोधक आणि आरोग्य व्यावसायिक आता अशा प्रगत प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतील, ज्याद्वारे भावनिक आणि मानसिक समस्यांचे अधिक अचूकपणे, आणि सहानुभूतीने निदान व उपचार करण्यास मदत होईल.”
देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या एमयूएचएसने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आता निहिलेंटसोबत करण्यात आलेल्या या भागीदारीमुळे एमयूएचएसला आरोग्यसेवेतील नाविन्यपूर्णतेमध्ये आघाडीवर आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून इमोस्केपच्या वैद्यकीय उपयोगांचा शोध घेतला जाणार असून, त्याचा वापर नॉन-कम्युनिकेबल आजार, बाल आणि किशोरवयीन आरोग्य, मातृत्वाशी संबंधित मानसिक आरोग्य, शस्त्रक्रियेस पूर्वी दिला जाणारा समुपदेश, मानसोपचारसंबंधी स्थिती आणि रुग्णाच्या गोपनीयतेचे रक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करता येणार आहे. भावनिक निदानाला मुख्य प्रवाहातील वैद्यकीय सेवेत स्थान मिळवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. समग्र आणि रुग्णकेंद्रित उपचार देण्याच्या आपल्या बांधिलकीशी सुसंगत असा हा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
रुग्णसेवेमध्ये इमोशनल एआयच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना निहिलेंटमधील इमोस्केपचे बिझनेस डायरेक्टर संदीप पेंडुरकर म्हणाले, “आम्ही प्रथमच असा एक प्लॅटफॉर्म सादर करत आहोत, ज्यामध्ये एआय, क्लिनिकल सायन्स आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एकत्रित वापर करून आरोग्यसेवेची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. इमोस्केप भावनिक स्थिती अत्यंत अचूकपणे ओळखू शकतो आणि त्यामुळेच हे तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरले आहे. एमयूएचएससोबतची ही भागीदारी केवळ तांत्रिक नवकल्पनांपुरती मर्यादित नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात भावनिक आरोग्यासाठी एक नवी चौकट तयार करण्याचा प्रयत्न आहे. भावना ओळखून आणि समजून घेतल्यामुळे, अधिक वैयक्तिक आणि परिणामकारक उपचार करणे शक्य होते. यामुळे रुग्णाचे आरोग्य सुधारतेच, पण संपूर्ण आरोग्यसेवेचा अनुभवही अधिक सकारात्मक होतो.”
वैद्यकीय क्षेत्रातील उपयोगांव्यतिरिक्त, या भागीदारीअंतर्गत निहिलेंटच्या ‘समर इंटर्नशिप’ कार्यक्रमातून एमयूएचएसच्या विद्यार्थ्यांना एआय आणि आरोग्यसेवा यांची ही सांगड प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. या उपक्रमामुळे भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिक तांत्रिक प्रगतीचा स्वीकार तर करतीलच, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रात नावीन्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि सखोल ज्ञानही मिळवू शकतील.
एमयूएचएस आणि निहिलेंट यांच्यातील ही भागीदारी भारताला इमोशन-एआयवर आधारित आरोग्यसेवेत जागतिक नेतृत्व मिळवून देण्याचा मार्गही मोकळा करते. दोन्ही संस्था सखोल संशोधनाद्वारे अनुभवाधारित डेटा तयार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या माध्यमातून भावनिक निदान मुख्य प्रवाहात आणणे आणि जगभर स्वीकारली जाऊ शकेल अशी समग्र, मानवकेंद्री वैद्यकीय प्रणाली विकसित करणे, हा या भागीदारीचा व्यापक उद्देश आहे.
एका औपचारिक समारंभात एमयूएचएस आणि निहिलेंट यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या वेळी दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. एमयूएचएसतर्फे मा. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलगुरु; मा. डॉ. मिलिंद निकुंभ, प्र-कुलगुरु; मा. डॉ. राजेंद्र बांगल, कुलसचिव आणि श्री. संदीप राठोड, सहायक कुलसचिव यांनी या समारंभास उपस्थिती दर्शवली. निहिलेंटतर्फे इमोस्केपचे बिझनेस डायरेक्टर श्री. संदीप पेंडुरकर, प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट श्री. सौरभ शाळिग्राम आणि असोसिएट कन्सल्टंट सौ. सई संजना चित्तुरी हे उपस्थित होते.
भावनिक आरोग्य आणि तांत्रिक नवकल्पना यांना सारखेच महत्त्व देत आरोग्यसेवेचे स्वरूपच बदलणाऱ्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भागीदारीच्या पुढील टप्प्यांमधून आरोग्यसेवा प्रणालीतील नव्या शोधांसाठीची वाट अधिक स्पष्ट होत जाईल आणि इमोशन-एआयवर आधारित वैद्यकीय पद्धतींमध्ये भारत आघाडीवर राहण्याची खातरजमा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments