Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र...

सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९ : सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी त्यांची वयोगट, शिक्षण यानुसार यादी (डाटाबेस) तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

सफाई कामगारांच्या विविध अडचणी व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसार खैरनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. गुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, पुणे मनपाचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड यांच्यासह पुणे, खडकी छावणी मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सफाई कामगार आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांची निश्चित आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालये, नगरपालिका, महसूल कार्यालये आदी ठिकाणच्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करावे. या समाजातील तरुण पिढीला शिक्षणासाठी, युवा पिढीला विश्वकर्मा योजनेतून रोजगार आणि उर्वरितांना अन्य सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ससून रुग्णालयातील सफाई कामगारांच्या वारसांच्या अनुकंपा भरतीविषयक प्रकरणे आदींवर कार्यवाही गतीने व्हावी यासाठी पुढील आढवड्यात बैठक घ्यावी. ४८ बदली कामगारांचे भरतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. सफाई कामगारांचे वेतन त्यांना रोख हातात न देता त्यांच्या बँक खात्यावर दरमहा ५ तारखेच्या आत जमा करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच तसे झाल्याबाबत दरमहा १५ तारखेपर्यंत बँक स्टेटमेंट मागवून खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींनी सफाई कामगारांचे प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक राहून अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments