पुणे दिनांक १० जून २०२५
अग्रमानांकित मोहिल ठाकूर, तृतीय क्रमांक मानांकित नीरवज् मुळ्ये यांच्यासह मानांकित खेळाडूंनी शारदा स्पोर्ट्स सेंटरने आयोजित केलेल्या शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही स्पर्धा शारदा ग्रुप व डेक्कन डाईज अँड केमिकल्स यांनी पुरस्कृत केली आहे.
ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे दिनांक १५ जून पर्यंत चालणार आहे. या मोसमातील ही पहिलीच मानांकन स्पर्धा असून त्यामध्ये जवळ जवळ सहाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सौ. स्मिता बोडस यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीराम कोनकर, आशिष बोर्डस, अरविंद नातू, उपेंद्र मुळ्ये आदी संघटक उपस्थित होते.
ठाकूर याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत वरद माळवदकर याचा ११-२,११-५, १२-१० असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला तर मुळे याने तनय इंगवले याचे आव्हान १२-१०,११-४,११-९ असे संपुष्टात आणले. चौथा मानांकित एल्विस टॉम याने स्वयंम कोठावळे याच्यावर ११-३,११-६,११-७ असा दणदणीत विजय नोंदविला. या तीनही खेळाडूंनी टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला पाचवा मानांकित ऋग्वेद दांडेकर याने वरदान पवार याला ११-९,११-९,११-० असे सरळ तीन गेम्स मध्ये नमविले. त्याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. शेवटच्या गेम मध्ये त्याने केलेल्या आक्रमक खेळापुढे पवार याला एकही गुण मिळवता आला नाही. सहाव्या मानांकित आर्यन वानखेडे याने अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडवित अथर्व शर्मा याचा ११-८,९-११,११-७,११-५ असा चुरशीच्या लढतीनंतर पराभव केला. शर्मा याने या लढतीमध्ये दुसरी गेम घेत उत्सुकता वाढवली होती मात्र नंतरच्या दोन्ही गेम्स मध्ये त्याला स्वतःचा प्रभाव दाखविता आला नाही. सातव्या मानांकित नभ पंचोलीया याने श्लोक प्रधान याच्यावर १२-१०,११-१,११-४ अशी मात केली श्लोक याने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली तथापि नंतर त्याचा खेळ निष्प्रभ ठरला. तर नीरज नांदेडे याने वरदान कोलते याला ११-६,१२-१०,११-९ असे पराभूत केले. कोलते याने दुसऱ्या व तिसऱ्या गेम मध्ये चांगली झुंज दिली मात्र या दोन्ही गेम्स आणि पर्यायाने सामना जिंकण्यात त्याला यश मिळाले नाही.


