Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याची जबाबदारी...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याची जबाबदारी समन्वयाने पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

अतिरिक्त आयुक्तांनी दोन्ही पालखी मार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सूक्ष्म नियोजनाच्या सूचना
पिंपरी, दि. १३ जून २०२४ :- आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व नियोजित कामे विहीत वेळेत पुर्ण करून सर्वांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका प्रशासकीय यंत्रणेला दिले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, देवन्ना गट्टूवार, नितीन देशमुख, उपआयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, किशोर ननवरे, निवेदिता घार्गे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विनय ओहोळ, मनोहर जावरानी, महेश कावळे, विजय वायकर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आषाढीवारी पालखीने पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर निगडी येथील भक्ती शक्ती येथे सर्व वारकरी बांधव तसेच विश्वस्त आणि दिंडीप्रमुख यांचे याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागत केले जाते. याठिकाणी उभारण्यात येणाऱा स्वागत कक्ष तसेच करण्यात येणा-या व्यवस्थेबद्दलची माहिती जांभळे पाटील यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. याठिकाणची देखील त्यांनी पाहणी केली आणि करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दल माहिती घेतली. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. याठिकाणी देखील त्यांनी पाहणी केली आणि दिंड्यांचा मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना जांभळे पाटील यांनी दिल्या. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिनी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणी त्यांनी पाहणी केली. याशिवाय पालखी मार्गावर अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवावे, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारावे, विद्युत वाहक तारा हटवाव्यात, पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे, उघडी गटारे यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करावी. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत, पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी देखील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली.
स्थापत्य,विद्युत,रस्ते वाहतूक,पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी पूर्ण करावी अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments