*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच लाखांहून अधिक वारकरी, विद्यार्थी, प्राध्यापक, योग अभ्यासक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपक्रमात सहभागी होणार – श्री. राजेश पांडे यांची माहिती*
*उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडणार – डॉ. सुरेश गोसावी*
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुणे शहरात राहणार असून, या दिवशीच जागतिक योग दिन आहे. या योग दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य ‘वारकरी भक्तीयोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम होणार आहे. या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे साधारण १० लाख लोक योग करून, योग विषयाचा प्रसार – प्रचार करतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पांडे यांनी माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.
श्री. पांडे म्हणाले की, वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असतात. यंदा त्याचवेळी जागतिक योग दिवस आला आहे. या निमित्ताने २१ जूनला सकाळी वारकरी भक्तीयोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न होणार आहे. मुख्य कार्यक्रम विद्यापीठाच्या इनडोअर सभागृहात २१ जूनला सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होईल.या उपक्रमात शहरात सुमारे पाच लाख वारकरी आणि तितकेच पुणेकर भजन, कीर्तन, प्रवचन, योगसाधना अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून, शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, पुण्यातील साधारण २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे श्री. पांडे यांनी सांगितले. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली आहे.यामध्ये ६०० हून अधिक स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले.
…..
भक्तीयोग उपक्रमात काय होणार
…
पुणे शहरात ७०० हून अधिक दिंड्या दरवर्षी पुण्यात मुक्काम करतात. यावर्षी २१ जून रोजी पालख्या शहरात असणार असल्याने योग दिन आणि पालखी उत्सव यांचा सुंदर संगम साधला जाणार आहे. साधारण २०० महाविद्यालयांतील ७,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या, प्रत्येक दिंडीसोबत
पाच महाविद्यालयांचे एक पथक राहणार आहे. या पालख्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी योग उपक्रम राबविण्यात येईल. सहभागी वारकऱ्यांच्या माध्यमातून योग, जीवनमुल्ये, लोकसहभाग अशा विविध मुद्द्यांवर प्रचार – प्रसार करणार आहेत. हा उपक्रम तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे, असे श्री.राजेश पांडे यांनी सांगितले.
…..
सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागेल
…..
भक्तीयोग’ उपक्रमात सहभागी विद्यार्थी कल्याण अधिकारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि प्रत्येक दिंडीमध्ये सहभागी होणारे किमान २० विद्यार्थी/स्वयंसेवक यांची नावनोंदणी https://bcud.unipune.ac.in/NSS/NSS_Registration/Bhaktiyog_Registration.aspx या लिंकद्वारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र, टोपी व टि-शर्ट देणे सोईस्कर होईल. हा उपक्रम संपन्न झाल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी आपला अभिप्राय खालील QR कोडद्वारे नोंदवणे आवश्यक आहे. अभिप्राय प्राप्त महाविद्यालयातील स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमाची संपूर्ण माहिती महाविद्यालयामार्फत सबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविण्यात यावी; तसेच विद्यार्थ्यांकडून सहभागी होण्याचे हमीपत्र घेऊन, या हमीपत्रावर पालकांची व महाविद्यालयातील मा. प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी यांची स्वाक्षरी घेवून महाविद्यालयामध्ये जतन करून ठेवावी, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले आहे.
…..
कोट
…
वारकरी भक्तीयोग उपक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे आणि लोकसहभागाच्या शक्तीचे प्रत्यक्ष शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास वाटतो. वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल.
– राजेश पांडे, सदस्य, सल्लागार समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
….
कोट
…
वारकरी भक्तीयोग उपक्रमात पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांनी; तसेच खाजगी विद्यापीठांनी सहभागी होऊन योग विषयाच्या प्रसार प्रचारासोबत लोकसहभागाची चळवळ पुणे नेण्यासाठी काम करावे. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना असे दोन विभाग या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी सहभागी होण्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
–


