पुणे, ११ फेब्रुवारी २०२४ लोकविश्वास प्रतिष्ठान या गोव्यातील दिव्यांग मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन करणाऱ्या संस्थेतर्फे आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात दोनशे पेक्षा अधिक मूकबधिर, अंध, बौद्धिक दृष्ट्या कमकुवत, विकलांग आणि दिव्यांग मुला, मुलींनी गीत रामायणावर आधारित मंत्रमुग्ध करणारे महानाट्य सादर केले. या महानाट्यात सहभागी झालेल्या विशेष मुलांचे पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक केले तसेच जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांनी सादर केलेल्या या विलक्षण महानाट्याने नाटयगृहात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते.
अयोध्येत नुकतीच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि रामलल्लाला मनापासून अभिवादन करण्यासाठी लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दोनशे विशेष मुलांनी पुणेकरांसाठी गीत रामायणावर आधारित महानाट्य सादर केले. दिव्यांग मुलांचा स्टेजवरील लिलया वावर, उत्साह, नाच, गाणी, संवाद फेक आणि जोश पाहून पुणेकर मंत्रमुग्ध झाले. राम जन्मला ग सखे, माता न तू वैरिणी, जय गंगे जय भागिरथी अशा अनेक अजरामर गाण्यावर या मुलांनी महानाट्य सादर केले. दोन तासांचे हे महानाट्य ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या गीत रामायणावर आधारित होते.
या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत आदी व्यवस्था या विशेष मुलांनी, शिक्षकांनी केली होती. गाणी देखील अंध मुला मुलींनी सादर केली. कार्यक्रमाला लोकविश्वास प्रतिष्ठान चे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


