पुणे,25 जुलै 2025 : हेपॅटायटिसमुळे होणारा गंभीर परिणाम टाळण्यासाठी लवकर निदान आणि उपचार गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. 28 जुलै वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त याबाबत जगभरात जागृती केली जाते. यावर्षीची संकल्पना हेपॅटायटिस : लेटस् ब्रेक ईट डाऊन ही आहे.
हेपॅटायटिस हे ए,बी,सी,डी,ई या पाच प्रकारात विभागले गेले आहे. यातील हेपॅटायटिस ए व ई दूषित अन्न पाण्यामुळे होऊ शकतो. तर बी,सी व डी हे बाधित व्यक्तीच्या रक्ताशी संपर्कात आल्यावर किंवा द्रव पदार्थांमुळे होऊ शकतो.
भारतात हेपॅटायटिस बी आणि सी याचे प्रमाण जास्त असून निदान न झाल्यास दीर्घकालीन यकृताचे आजार,यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग असे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.जुन्या सुयांचा पुनर्वापर,दुसऱ्याचे रेझर वापरणे,असुरक्षित शारीरिक संबंध,बाधित व्यक्तीकडून रक्तसंक्रमण,मद्यसेवनासारख्या चुकीच्या सवयी असे अनेक जोखमीचे घटक असतात.
याबाबत बोलताना विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ.प्रविश घुरडे म्हणाले की, सर्वांत मोठे आव्हान हे आहे की, हेपॅटायटिसची लक्षणे प्रारंभिक टप्प्यात दिसत नाहीत.कालांतराने कावीळ,ताप,थकवा,भूक न लागणे,मळमळ,उलट्या अशी लक्षणे दिसू शकतात.यावर वेळीच उपचार केले नाहीत तर,यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात.म्हणूनच लवकर निदान व उपचार गरजेचे आहेत.
ते पुढे म्हणाले की, गर्भवती महिलांनी हेपॅटायटिसबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे,कारण याचा प्रसार मातेकडून बाळाला होऊ शकतो.सध्या पावसाळा सुरू आहे,म्हणून दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस ए आणि ई बाबत काळजी घेतली पाहिजे. विशेष करून हेपॅटायटिस ई ची तीव्रता गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत जास्त असू शकते.म्हणूनच घरचे अन्न खाणे,भाज्या व्यवस्थित धुवून घेणे,स्वच्छ पाणी किंवा पाणी उकळून पिणे हे योग्य ठरेल.
ज्यांच्या कुटुंबात हेपॅटायटिस किंवा यकृताच्या आजाराचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान चाचण्या करून घ्याव्यात.आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा रक्ताशी संपर्क येत असल्याने त्यांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.


