मुंबई, 4 ऑगस्ट 2025 : पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये भरघोस प्रतिसादात आयोजित क्रॉसवर्ड बुक-अ-थॉनच्या निमित्ताने वाचक, विद्यार्थी आणि प्रशंसकांना डॉ. शशी थरूर यांच्यासमवेत एक उत्तम संध्याकाळ घालविण्याची संधी मिळाली. क्रॉसवर्ड बुकस्टोअरचे सीईओ आकाश गुप्ता यांच्याशी संवाद साधताना डॉ. थरूर यांनी ‘अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन’ : अ कन्साइझ इंट्रोडक्शन अँड कमेंटरी हे पुस्तक सादर केले. अलेफ बुक कंपनीतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. थरूर म्हणाले की, हे पुस्तक केवळ कायदेतज्ज्ञांसाठी नव्हे, तर संविधानामागील कल्पना, त्याचा उद्देश आणि रोजच्या आयुष्यात त्याला खरी अर्थवत्ता देण्यासाठी काय गरज असते हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या आणि स्वतःचे हक्क समजून घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी लिहिले आहे.
खुसखुशीत विनोद, वैचारिक आणि अनेक सूक्ष्म बाबींना स्पर्श करणाऱ्या या संवादातून डॉ. थरूर यांची सार्वजनिक सेवेप्रति असलेली बांधिलकी आणि त्यांच्या प्रवासाला आकार देणाऱ्या मूल्यांची झलक देणाऱ्या कल्पना व किस्से उलगडले. बालपणीच्या आजारपणामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली आणि लहानपणीच मनात आलेल्या ‘आपल्या आयुष्याचा उद्देश काय, बदल घडवून आणण्याचा खरा अर्थ काय’ अशा प्रश्नांनी त्यांच्या लेखनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंतच्या प्रत्येक कृतीला दिशा दिली आहे, असे ते म्हणाले.
क्रॉसवर्ड बुकस्टोअर्सच्या कार्यक्रमातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना डॉ. थरूर म्हणाले, “रविवारी संध्याकाळी इतक्या लोकांनी येथे येणे आणि केवळ मॉलमध्ये खरेदीसाठीच नाही, तर पुस्तके, वैचारिक देवाणघेवाण आणि संवाद साधण्यासाठी आले आहेत, हे पाहून छान वाटले. इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आणि स्वाक्षरीसाठी रांगा लावल्या, हे पाहून लेखक म्हणून माझ्या मनाला आनंद झाला. पुण्यात अजूनही इतके वाचक आहेत हे पाहून स्पष्ट होते की हे खरोखरच साहित्यप्रेमी शहर आहे.”
ज्यांना हे सत्र अनुभवता आले नाही, त्यांच्यासाठी डॉ. थरूर म्हणाले : “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन सुरू ठेवणे. इतक्या लोकांना, वाचकांना प्रत्यक्ष भेटून मला खूप आनंद झाला. जे येऊ शकले नाहीत, त्यांना पुढेही संधी मिळेल. खरे तर, माझ्यातील सर्वोत्तम भाग माझ्या छापील पानांमध्ये आहे. तो जरूर वाचा.”
या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना आकाश गुप्ता म्हणाले, “क्रॉसवर्डमध्ये डॉ. शशी थरूर यांच्याशी बुकस्टोअरमध्ये संवाद साधता आला. यातून बुकस्टोअर हे लोकविचार घडविण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतात, याची प्रभावी जाणीव करून देणारे ठरले. आजच्या काळात जेव्हा संविधानाविषयी चर्चा, वादविवाद आणि अनेकदा गैरसमज असतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून संविधानाविषयीची स्पष्टता, बारकावे आणि ठाम धारणा जाणवते. अशा महत्त्वाच्या चर्चांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आम्हाला अभिमान आहे, जिथे चर्चा या केवळ स्क्रीनवर नव्हे तर प्रत्यक्षात घडतात. वाचक प्रश्न विचारतात, कल्पनांची देवाणघेवाण होते. हेच जिवंत लोकशाहीचे खरे रूप आहे आणि सळसळते बुकस्टोअर हे असे असते.”
फिनिक्सचे [पुणे मॉल्स] सीनियर सेंटर डायरेक्टर अंशुमन भारद्वाज म्हणाले, “वैचारिक देवाणघेवाण आणि समुदाय एकत्र येण्यास चालना देणाऱ्या जागा फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे निर्माण करण्याचा अभिमान आहे. आज डॉ. शशी थरूर यांना ऐकण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांना पाहून पुण्याची पुस्तकांबद्दलची आणि सार्वजनिक चर्चेबद्दलची आवड दिसून येते. शहरात चिंतनाला चालना देणाऱ्या आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देतो.”
संध्याकाळचा शेवट पुस्तक स्वाक्षरी सत्राने झाला, जिथे उपस्थितांना डॉ. थरूर यांना भेटण्याची आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रतींवर वैयक्तिक स्वाक्षरी करून घेण्याची संधी मिळाली.
‘अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन’ आता देशभरातील क्रॉसवर्ड बुकस्टोअर्समध्ये आणि www.crossword.in या ठिकाणी उपलब्ध आहे.


