पुणे,15 फेब्रुवारी 2024 : केईएम हॉस्पिटल पुणे मधील ऑक्युपेशनल थेरपी विभागामध्ये लहान मुलांसाठी सेन्सरी युनिट सुरू करण्यात आले आहे. हे युनिट सेन्सरी रूमच्या स्वरूपात असून ह्या मध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी), अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) व सेन्सरी प्रोसेसिंग डिसाऑर्डर असलेल्या लहान मुलांच्या विशेष गरजांसाठी उपयुक्त ठरतील अशा सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीसारख्या विविध उपचार पद्धतींचा समावेश आहे. या युनिटचे उद्घाटन केईएम हॉस्पिटल पुणे मधील वरिष्ठ सल्लागार व प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ.सुधा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना केईएम हॉस्पिटल पुणे येथील ऑक्युपेशनल थेरपीस्ट भारती पाटील म्हणाल्या की, मुलांमध्ये विविध संवेदनासंबंधी समस्या या त्यांच्या संवेदनांद्वारे प्राप्त माहितीवर योग्य प्रक्रिया करण्याच्या असमर्थतेमुळे निर्माण होतात.
स्पर्श, दृष्टी, श्रवण, गंध आणि चव या पाच दृश्य संवेदना आहेत. जर या संवेदना एकत्रितपणे कार्य करत नसतील तर मुले हायपरअॅक्टीव (अतिक्रियाशील) किंवा हायपरअॅक्टीव (सक्रिय नसणे) होतात. त्यातील काही उदाहरणे म्हणजे ही मुले प्रखर-प्रकाश किंवा मोठा आवाज सहन करू शकत नाहीत. झोके आणि खेळाच्या उपकरणांना घाबरु लागतात. त्याचप्रमाणे सतत उड्या मारणे, इतर मुलांना मारणे आणि वर्गातील मुलांचे लक्ष विचलित करणे, ह्या सारखे वर्तन दोष पण ह्या मुलांमध्ये दिसू शकतात.
भारती पाटील पुढे म्हणाल्या की, यावर औषध नसले तरी ऑक्युपेशनल थेरपी अतिसंवेदनशील भावना अनुभवत असलेल्या मुलांना स्थिर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यापैकी बहुतेक मुले 2.5 वर्षे ते 8 वर्षांपर्यंतच्या वयातील असतात.
संवेदनांद्वारे प्राप्त माहितीची योग्य प्रकारे प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी या सेन्सरी रूममध्ये ,विविध उपकरणे आणि पायाभूत सुविधा असतील.
याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय प्रशासक डॉ.विश्वनाथ येमुल म्हणाले की, सेन्सरी रूम ही संवेदनासंबंधी समस्या असलेल्या मुलांनाच मदत करण्याबरोबरच ही आव्हानात्मक परिस्थिती उदभवलेल्या या मुलांच्या पालकांमध्ये देखील आशा निर्माण करेल. सकारात्मक परिणामांसह तज्ञांच्या मदतीने अत्याधुनिक सुविधा आणि उपकरणे एकत्रित करून मुलांसाठी सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हे सेंटर सोमवार ते शनिवार- सकाळी 9.00 ते संध्याकाळी 4.00 या दरम्यान सुरू राहील.


