*
पुणे (दि ०८ ऑगस्ट) : महानगरांमध्ये प्रवासासाठी लागणारा वेळ एका तासात 30 किलोमीटर हवा, परंतु पुणे शहरामध्ये सध्या 19 किलोमीटर असून काही वेळेला केवळ १२ किलोमीटर राहतो. त्यामुळे शहराच्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध योजना राबवण्यासाठी चाचपणी केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये संख्येने कमी तसेच छोटे रस्ते असल्याने वाहतूक कोंडी सोडवताना अडचण येत आहे. त्यामुळे या भागामध्ये भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्तांना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यशदा येथे पार पडलेल्या पायाभूत उपाययोजनांच्या सादरीकरणानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी नियोजन करण्याची सूचना केल्याने आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा सुरू असणाऱ्या शनिवारवाडा ते स्वारगेट आणि स्वारगेट ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीला गती मिळणार आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या भुयारी मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यांमध्ये आले आहे. दोन किलोमीटरचे हे भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर मध्यवस्तीत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरातील वाहतुकीला गती देण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी सादरीकरण केले. या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूक ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय असून त्यानंतर ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवावे. कोणत्याही व्यक्तीला ५०० मीटरमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल याप्रमाणे नियोजन करा. सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. महानगरांमध्ये सरासरी वेगमर्यादा ३० किमी पर्यंत जाईल याप्रमाणे नियोजन करावे, अशा सूचनाही केल्या आहेत.
——– ———
चौकट
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास गती मिळणार आहे. मध्यवर्ती भागांमध्ये भुयारी मार्गांचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केल्यामुळे शनिवारवाडा –स्वारगेट भुयारी मार्ग प्रकल्पाला गती मिळणार आहे. मध्यवस्तीतल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढणारा हा प्रकल्प असून, मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
———————-
*विसर्जन मिरवणुकीचा वाद लवकरच सुटेल*
पुणे शहरात सुरू असणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वादावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे म्हटल्यानंतर चर्चा वादविवाद होतात, परंतु काळजी करण्याची गरज नाही. यासंदर्भात आमदार हेमंत रासने आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्वतः बैठक घेणार आहेत. सर्व मंडळे एकत्र बसून निर्णय करतील, दरवर्षी वाद निर्माण होतात मात्र सर्वजण मिळून तो सोडवतात. राज्य सरकारने यामध्ये मध्यस्थी करण्याची गरज नाही. पुणेकर चर्चेअंती एकमत करतील”


