पुणे – “धनंजय थोरात या कार्यकर्त्याला सत्यशोधक विचारांची परंपरा होती. कार्यकर्त्याचा पिंड भिनलेला होता. संवेदनशील, कलाप्रेमी आणि पुरोगामी विचारांचा पाईक, असा हा कार्यकर्ता होता. त्याच्या स्मृती मृत्यूनंतर १७ वर्षांनंतरही समारंभपूर्वक जपल्या जातात, ही फार मोठी गोष्ट आहे”, असे उद्गार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी येथे काढले.
माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते धनंजय थोरात यांच्या १७ व्या स्मृतिप्रित्यर्थ, ‘धनंजय थोरात प्रतिष्ठान’ आयोजित आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
शिवाजीनगर येथील संतमाई सभागृहात रविवारी सायंकाळी हा सोहळा संपन्न झाला. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी कार्य करणारे अशोक देशमाने, गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जुगल राठी यांना याप्रसंगी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह, असे देशमाने यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे तर प्रत्येकी ११ हजार रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असे राठी व पणशीकर यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
धनंजय थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, ज्येष्ठ संपादक पराग करंदीकर, अंकुश काकडे, बिपीन गुपचुप, शिरीष बोधनी, प्रथमेश आबनावे आदी यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “धनंजय थोरात यांचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पण त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. आज सर्वत्र लोकशाहीला घातक कालखंड दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संसदेत उत्तरे मिळत नाहीत. डिजिटलचा उदोउदो करणार्यांना राहुल यांनी डिजिटल स्वरुपात कादगपत्रे मागितली, ती मिळू शकली नाहीत. ४५ दिवसांत रेकार्ड नष्ट करण्याचा पराक्रम या मंडळींनी केला. सीसीटिव्ही फूटेजची मागणी नाकारली. तरीही राहुल यांनी जिद्दीने सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून मांडणी केली. धनंजय थोरात यांच्यामध्येही अशीच जिद्द होती आणि वैचारिक वारसा होता”.
उल्हास पवार म्हणाले, “निष्ठावंत, सच्चा आणि निरपेक्ष वृत्तीने वावरणारा कार्यकर्ता, ही धनंजयची ओळख होती. त्याच्या स्मृतींचे जतन आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन, हा उद्देश या पुरस्कारामागे आहे”.
पुरस्कारप्राप्त देशमाने म्हणाले, “मी आयटी क्षेत्रात नोकरी करत असताना, आमच्या परभणीमधील गावात शेतकर्याची आत्महत्या अनुभवली आणि जीवनाची दिशा बदलली. गेल्या १० वर्षांपासून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची सुमारे २०० मुले पालक या नात्याने सांभाळत आहोत. चांगल्या कामाच्या पाठीशी समाजातील चांगले लोक उभे राहतात, याचा अनुभव आम्ही घेत आहोत. आमच्या स्नेहवनचे सर्व काम, प्रशासकीय आणि दैनंदिन कामकाज विद्यार्थीच पाहतात. सर्व प्रकल्प सौरउर्जेवर चालतो. गोशाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय यांनी सुसज्ज प्रकल्प आहे. मोबाईल आणि टिव्ही यांना मनाई आहे”.
जुगल राठी म्हणाले, “सजग नागरिक मंच, माहिती अधिकार कायद्याविषयी जागरुकता आणि पीएमटी प्रवासी मंच, अशा व्यासपीठांच्या माध्यमातून समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे”. पणशीकर यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र पिनाकिन यांनी स्वीकारला.
मोहन जोशी धनंजय थोरात यांच्या आठवणींनी गहिवरले. ते म्हणाले, “दरवर्षी हा पुरस्कार सोहळा वेगळी उंची गाठतो. धनंजय गेल्यानंतरच्या पहिल्या पुरस्कारप्रदानाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आले होते. त्यांनी प्रतिष्ठानला १५ लाख रुपयांची देणगी दिली. सर्व प्रमुख नेते या पुरस्कारासाठी आर्जून उपस्थित राहतात. धनंजयच्या लोकप्रियतेचे आणि संपर्काचे हे द्योतक आहे. धनंजयचे राजकीय सामाजिक कार्य आणि त्याचे संगीतप्रेम, लक्षात घेऊन हे पुरस्कार प्रदान केले जातात”.
मोहन जोशी यांनी स्वागत केले व आभार मानले. पराग करंदीकर यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
———–


