Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुद्धनीती आणि योग्य रसद व्यवस्थेने युद्धभूमीवर विजयाचा चमत्कार घडतो निवृत्त कर्नल पराग...

युद्धनीती आणि योग्य रसद व्यवस्थेने युद्धभूमीवर विजयाचा चमत्कार घडतो निवृत्त कर्नल पराग मोडक यांचे मत : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने भारत इतिहास संशोधक मंडळास देणगी

पुणे : कोणत्याही युद्धात पुरवठा व्यवस्थापन चा अदृश्य हात असतो. युद्धाचे यश-अपयश युद्धकालीन रसद व्यवस्थेवर अवलंबून असते. युद्धस्थिती निर्माण झाल्यावर पुरवठा कोणत्या प्रमाणात आणि किती वेगाने होतो, यावर सैनिकांचे मनोबल आणि युद्धातील यश मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. युद्धनीती आणि रसद पुरवठा याचे योग्य नियोजन असेल तर युद्धभूमीवर चमत्कार घडू शकतो, असे मत निवृत्त कर्नल पराग मोडक यांनी व्यक्त केले.

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने भारत इतिहास संशोधक मंडळास २,५०,००० /- रकमेचा धनादेश देणगी म्हणून देण्यात आला. यावेळी ‘लढाई व्यवस्थापन शिवशाही ते ऑपरेशन सिंदूर’ या विषयावरील व्याख्यानात मोडक बोलत होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळात करण्यात आले होते. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पुष्करसिंह पेशवा, संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त सुधीर पंडित, जगन्नाथ लडकत , आशिष कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे यांनी देणगी धनादेश स्वीकारला. कार्यक्रमात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नावाने बनविलेल्या वेबसाईटचे जयमंगलाराजे पेशवा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पराग मोडक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांचा रसद पुरवठा आणि सामान्य जनतेबद्दल दक्ष होते. काहीही झाले तरी जनतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू द्यायचा नाही असा त्यांचा विचार होता. थोरले बाजीराव पेशव्यांनी प्रत्यक्ष युद्ध न करता कच्चा दुवा हेरून रसद पुरवठ्यावर आक्रमण करून शत्रूंना शरण आणले होते.

ते पुढे म्हणाले, पानिपतची लढाई यशस्वी झाली नाही त्यामागे रसद पुरवठा हे महत्त्वाचे कारण होते. लढणाऱ्या सैनिकांना खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. त्याचप्रमाणे १९६२ च्या भारत चीन युद्धातील भारताच्या पराभवाचे रसद पुरवठा हे कारण आहे. भारताचे सैनिक शूर असून सुद्धा शेवटच्या टप्प्यावर भारताला माघार घ्यावी लागली. त्यानंतर झालेल्या १९६५ आणि १९७१ च्या युद्धात युद्धनीती आणि रसद पुरवठा याचे योग्य नियोजन करण्यात आले आणि आपला विजय झाला.

रमेश भागवत म्हणाले, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि श्री देवदेवेश्वर संस्थान यांचे ऋणानुबंध शतकानुशतकाचे आहेत. मंडळाने संशोधनाची परंपरा अखंड चालू ठेवली आहे. आणि खरा इतिहास समाजाच्या समोर आणला आहे. त्यांचे कार्य पुढील काळात देखील असेच चालू राहण्यासाठी संस्थानच्या वतीने देणगी देण्यात आली आहे.

अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments