पुणे दि.२४ (प्रतिनिधी)
भारत देश वैचारिक, सांस्कृतिक,संत – अध्यात्मिक परंपरेने समृद्ध असून सर्वे भवंतू सूखिन: हा विचार देणारे जगातील एकमेव राष्ट्र आहे. येथील संस्कृती, राष्ट्रीयत्व टिकविण्याकरिता वेळोवेळी समाजप्रबोधकांनी योगदान दिले आहे. व्याख्यानमालांच्या माध्यमातून आजही हे काम व्याख्यानमाला संयोजक अतिशय चोखपणे करीत असून त्यांनी राष्ट्रीय विचार प्रवाहित करण्यासाठी येथील मूल्याधिष्ठित संस्कृती चांगल्या परंपरा, कुटुंबव्यवस्था जतन करण्यासाठी याचा अधिक चांगला उपयोग समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून करण्याचे आवाहन मान्यवरांनी रविवार दि. २४ रोजी भावे शाळेतील प्र. ल.गावडे सभागृहात स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमाला संयोजक परिषदेत केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र कुलगुरू पराग काळकर, दिलीप क्षीरसागर, रविंद्र मुळे , स्वानंद जनकल्याण चे सुधीर काळकर, रवींद्र शिंगणापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दिलीप क्षीरसागर यांनी सध्या कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये, स्वबोध या प्रमुख मुद्यांवर भर देऊन या संबंधी समाज जागृती करणे गरजेचे असल्याचे सांगून आपली संवैधानिक मूलतत्वे, भारतीय लोकशाही टिकविणे गरजेचे असून भारतीय मूल्ये व संस्कृतीतच विश्वकल्याणाचा मार्ग असल्याचे सांगितले. राष्ट्रहितासाठी काम करणारी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षापासून या संबंधी काम करीत असल्याचे सांगून स्वयंसेवक विविध क्षेत्रात आदर्श काम करीत लक्षावधी सेवाकार्य चालवित आहेत, या संघटनात्मक चळवळीचे शताब्दी वर्ष असून राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणाऱ्या या संघटनेने देखील समाजपरिवर्तनासाठी पंचपरिवर्तन विषय समाजहितात सुरू केले त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केलं. काळकर यांनी सर्व व्याख्यानमाला संयोजकांचे कौतुक करून ग्रामीण भागात देखील हा वसा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याच वेळी स्वानंद सारख्या आयोजकांनी या विषयावर एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग procedure (SOP) देखील तयार करावी असे आवाहन केले.
समारोपीय भाषणात श्री रविंद्र मुळे यांनी आपण जातीपातीत न अडकता पुण्यपुरातन संस्कृती असलेला भारत समजून घेऊन विकसित भारत घडविण्यासाठी एकत्र येऊन वैचारिक प्रबोधनाचे वाहक होण्याचे आवाहन केले.
चर्चासत्रात रवींद्र शिंगणापूरकर यांनी व्याख्यानमाला संयोजकांशी संवाद साधला, प्रस्ताविक श्री रवींद्र वैद्य यांनी केले तर आभार श्री राघवेंद्र देशपांडे यांनी मानले.


