Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनाहत नादाची प्रचिती देणारे रुद्रवीणा आणि पखवाज वादन प्रसिद्ध रुद्रवीणावादक कै.स्व.पं. हिंदराज...

अनाहत नादाची प्रचिती देणारे रुद्रवीणा आणि पखवाज वादन प्रसिद्ध रुद्रवीणावादक कै.स्व.पं. हिंदराज दिवेकर यांच्या स्मरणार्थ हिंदगंधर्व संगीत महोत्सव प्रसिद्ध रुद्रवीणा वादक विदुषी ज्योती हेगडे यांचे सादरीकरण मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने आयोजन

पुणे : अतिशय दुर्मिळ रुद्रवीणेचे स्वर्गीय अनुभूती देणारे वादन…नादब्रह्माची साधना करणारे पखवाज वादन…ताल आणि लयीच्या नादातून मंत्रमुग्ध झालेले रसिक अशी संगीत कलेची उत्तुंग अनुभूती देणाऱ्या सादरीकरणातून अनाहत नादाची प्रचिती उपस्थितांना मिळाली.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने प्रसिद्ध रुद्रवीणा वादक कै.स्व.पं. हिंदराज दिवेकर यांच्या स्मरणार्थ हिंद गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. सतीश देसाई, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, खजिनदार नितीन पंडित,विनायक कदम, हेमंत दिवेकर उपस्थित होते.

प्रसिद्ध रुद्रवीणा वादक विदुषी ज्योती हेगडे, पखवाज वादक निखिल घोरपडकर यांनी यावेळी सादरीकरण केले. त्यांना माधुरी घोरपडकर( तानपुरा) आणि देवेंद्र देशपांडे यांनी (हार्मोनियम) साथसंगत केली.

विदुषी ज्योती हेगडे म्हणाल्या, रुद्रवीणा वादक स्वर्गीय हिंदराज दिवेकर यांच्या पश्चात ते विस्मृतीत जातील अशी भीती होती, परंतु तुळशीबाग गणपती मंडळाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम ठेवून त्यांच्या वादन कलेला जिवंत ठेवले. हिंदराज दिवेकर हे अतिशय उत्तुंग उंचीचे रुद्रवीणा वादक होते. पुणेकरांनी त्यांचे कायम स्मरण केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

निखिल घोरपडकर यांच्या पखवाज वादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी ताल धमार ची प्रस्तुती केली. रागातून वेगवेगळ्या लयकारी त्यांनी सादर केल्या. वादनातून त्यांनी तोफेतून गोळे बाहेर पडताना येणारा आवाज सादर केला. त्यांच्या या अद्भुत सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. श्री गणेश आणि शिवरायांना त्यांनी वादन कलेतून अभिवादन केले.

ज्योती हेगडे यांनी आपले वादन हिंदराज दिवेकर यांना समर्पित करून राग मालकंसने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर झपतालातील बंदीशी त्यांनी सादर केल्या. त्यांच्या स्वर्गीय अनुभूती देणाऱ्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. राग अभोगी मधील बंदिश सादर करीत त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले. मंगेश वाघमारे यांनी निवेदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments