Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपा...

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपा उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

पुणे, दि. २६ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजना व उपक्रमांचा प्रभावी अंमल सुरू असून या कार्यक्रमात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा एक महत्वाचा उपक्रम ठरला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गती देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

 

 

 

विशेष मेळावा आणि मार्गदर्शन

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विशेष मेळाव्यात उमेदवारांना शासन निर्णय, नियमावली व नियुक्ती प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. उमेदवारांचा पसंतीक्रम निश्चित करून नियुक्तीसाठी संबंधित विभागांकडे शिफारसी पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

 

 

गटवार नियुक्ती प्रक्रिया

 

गट-क पदाकरिता प्रतिक्षा यादीतील १६२ उमेदवारांपैकी ९७ उमेदवारांना नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली असून गट-ड पदाकरिता प्रतिक्षा यादीतील २४१ उमेदवारांपैकी १४७ उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे आणखी ४६ उमेदवारांची शिफारस पाठविण्यात आली आहे.

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर दिला आहे. ते म्हणाले की, “शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल. जिल्ह्यात ही प्रक्रिया पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.”

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments