नागपूर, दि. १३ : मुंबईतील झोपडपट्टी भागातून आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील नागरिकांचे पुनर्वसन झाल्याने रात्र शाळांतील विद्यार्थीसंख्येत घट झाली असली, तरी या शाळा बंद पडू नयेत आणि तेथील शिक्षकांवर कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने सन २०२५-२६ च्या संच मान्यतेसाठी रात्र शाळांची कमाल वयोमर्यादा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत सदस्य ज.मा. अभ्यंकर यांनी रात्र शाळांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, मुंबईतील अनेक झोपडपट्टी भागांमध्ये पुनर्वसन प्रकल्प व नवीन गृहनिर्माण योजना राबविण्यात आल्यामुळे तेथील रहिवासी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. परिणामी, या भागातील रात्र शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
या रात्र शाळा बंद होऊ नयेत आणि त्याठिकाणी सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. सन 2025-26 च्या संच मान्यतेसाठी रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा काढून टाकण्यात आली असून, 18 वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदणीला मान्यता देण्यात आली आहे.
एखादा शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांना दिवसाच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, यामुळे रात्र शाळांची सातत्याने सेवा सुरू राहील आणि शिक्षकांचे हितही सुरक्षित राहील, असेही राज्यमंत्री मंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी सांगितले.
०००००


