नागपूर, दि. १३ : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मध्यान्ह भोजन योजनेच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या चार संस्थांवर तसेच प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. चर्चेत सदस्य सचिन अहिर सहभागी झाले होते. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, केंद्र शासनाच्या नियमानुसार मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या अन्नाचा दर्जा व चव तपासण्यासाठी दोन नोंदवह्या ठेवण्यात येतात. या योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये चार संस्था पात्र असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे सादर केल्याचे तक्रारीनंतर झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अन्य पात्र संस्थांना हे काम देण्यात आले आहे.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी सदस्यांनी संशयास्पद संस्थांची नावे विभागाकडे सुचवावीत.


