संपूर्ण भारतभरातून 12 पदव्युत्तर शिष्यवृत्ती उपलब्ध असतील
– व्यवसाय व्यवस्थापन, वित्त, कला, नृत्य, कायदा, स्टेम विषय (STEM – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) आणि मानव्यविद्या इत्यादी विविध क्षेत्रांतील संधी.
– जागतिक स्तरावर मान्यता असलेल्या शैक्षणिक संधींच्या माध्यमातून भारत-यूके शैक्षणिक संबंधांत दृढता
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025: सांस्कृतिक संबंध आणि शैक्षणिक संधींसाठी कार्यरत असलेली यूकेची आंतरराष्ट्रीय संस्था, ब्रिटीश कौन्सिलने यूके सरकारच्या ‘ग्रेट ब्रिटन’ मोहिमेच्या भागीदारीत ‘ग्रेट शिष्यवृत्ती 2026-27’ जाहीर केली. ही शिष्यवृत्ती अशा महत्त्वाकांक्षी भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य करते, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे आणि ज्यांना यूकेमध्ये उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
2026-27 च्या शैक्षणिक वर्षासाठी, यूकेमधील आघाडीच्या विद्यापीठांकडून विविध विषयांमध्ये 12 पदव्युत्तर शिष्यवृत्ती प्रदान केल्या जात आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, नॉर्विच युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स, क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, रॉयल कंझर्व्हेटॉयर ऑफ स्कॉटलंड, रॉयल नॉर्दर्न कॉलेज ऑफ म्युझिक, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, ट्रिनिटी लॅबान कंझर्व्हेटॉयर ऑफ म्युझिक अँड डान्स, युनिव्हर्सिटी ऑफ डंडी, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, युनिव्हर्सिटी ऑफ सरे आणि यूडब्ल्यूई ब्रिस्टल यांचा समावेश आहे. प्रत्येक शिष्यवृत्ती एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कासाठी किमान £10,000 इतकी मदत देते. यामुळे भारतातील शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्राविण्य मिळवणे शक्य होणार आहे.
या शिष्यवृत्तीमध्ये वित्त, मार्केटिंग, व्यवसाय, मानसशास्त्र, स्टेम (STEM), डिझाइन आणि मानव्यविद्या तसेच कला, संगीत आणि नृत्य अशा वैविध्यपूर्ण शाखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात भागीदार असलेल्या चार विद्यापीठांनी विशेषतः ‘क्रिएटिव्ह आणि परफॉर्मिंग आर्ट्स’ विषयांसाठी ‘ग्रेट’ शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. हे केवळ शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतच नव्हे, तर कला शिक्षणातीलदेखील यूकेचे सामर्थ्य अधोरेखित करते.
‘ग्रेट’ (GREAT) शिष्यवृत्तीसाठी यूके सरकारची ‘ग्रेट ब्रिटन’ मोहीम, ब्रिटीश कौन्सिल आणि सहभागी यूके उच्च शैक्षणिक संस्था संयुक्तपणे निधी पुरवतात. उच्च दर्जाच्या ब्रिटीश शिक्षणाची उपलब्धता वाढवणे आणि त्याचबरोबर दोन्ही देशांमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक दृढ करणे हा या सर्वांचा उद्देश आहे.
यूकेची शिक्षण प्रणाली तिच्या शैक्षणिक दर्जासाठी आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या विषयांच्या व्याप्तीसाठी जगभरात ओळखली जाते. विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ असा की, त्यांना अध्यापनाच्या विविध पद्धती अनुभवता येतात, व्यावहारिक व विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते आणि त्यांचे शिक्षण प्रत्यक्ष जगात वापरण्याचे मार्ग उपलब्ध होतात. शिक्षणांनतर मिळणाऱ्या कामाच्या संधी या पदवीधर विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक अनुभव मिळवण्यास अधिक मदत करतात, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन करिअरला एक मजबूत दिशा मिळू शकते.
ब्रिटिश कौन्सिलच्या इंडिया एज्युकेशन डायरेक्टर रित्तिका चंदा परुक्क (MBE) म्हणाल्या, “ग्रेट शिष्यवृत्ती ही भारत-यूके शैक्षणिक भागीदारीची सखोलता आणि देशभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी संधींचा विस्तार करण्यासाठी असलेली आमची वचनबद्धता दर्शवते. यूकेमध्ये शिक्षण घेणे म्हणजे केवळ शैक्षणिक उत्कृष्टता मिळवणे नव्हे, तर व्यावसायिक जगाशी सुसंगत शिक्षण आणि अशा जागतिक वातावरणात प्रवेश मिळवण्याची संधी आहे जिथे विविध दृष्टिकोन एकत्रितपणे नवीन शोधांना प्रेरणा देतात. विविध विषयांमध्ये उपलब्ध असलेल्या या संधींमुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे पाऊल उचलण्यास मदत होईल, ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क प्रस्थापित करू शकतील, त्यांचे व्यावसायिक मार्ग अधिक मजबूत करू शकतील आणि झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. विविध क्षेत्रे, समाज आणि समुदायांचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना पाठबळ देताना आम्हाला आनंद होत आहे.”
ग्रेट शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूकेमध्ये विशेष पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे मार्ग अधिक सुलभ करेल. हे त्यांना जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि त्यांच्या भविष्यातील करियरसाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्ये
आत्मसात करण्यास मदत करेल.


