पुणे,1 मार्च 2024 : राजकारण आणि प्रशासनात पूर्वीपेक्षा आता जास्त महिला दिसून येत आहेत,मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात विशेष करून वित्त,बँकिंग,उद्योजकता,बोर्ड रूम अशा क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व वाढले पाहिजे असे मत भारताच्या माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे पोर्तुगाल आणि थायलंड येथील राजदूत लथा रेड्डी यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग मध्ये महिला आणि भू-अर्थशास्त्र या विषयावर फायरसाईड चॅट या विशेष सत्रात नॉर्वेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अँनिकेन हुइटफेल्ड यांच्यासह त्यांनी संवाद साधला.
त्या पुढे म्हणाल्या की,भारतात ग्रामीण ते शहरीकरण हा बदल होत असताना समाजात अजूनही समस्या आहेत,पण आजच्या महिला जुन्या दृष्टीकोनांना आव्हान देत आहेत. असमानता ही पुरूष आणि स्त्रियांच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनातून येते,जिथे स्त्रियांच्या मतांना पुरूषांइतके महत्त्व दिले जात नाही आणि निर्णय घेताना स्त्रिया या पुरूषांइतक्या कठोर नाहीत असे पाहिले जाते. म्हणूनच मनुष्यबळ विकास,सीएसआर, ग्राहकांशी संवाद,व्यवस्थापन अशा चौकटीबध्द भूमिकेमध्ये त्यांना सामावून घेतले जाते. त्यामुळे हे चित्र बदलायचे असेल तर सर्व क्षेत्रातील महिलांच्या विकासासाठी पोषक वातावरण असणे गरजेचे आहे.
अँनिकेन हुइटफेल्ड यांनी काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखण्याबाबतच्या समस्येवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की,मुलांची काळजी घेण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे.विशेष करून युध्द सुरू असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांना अधिक मदतीची गरज असते.महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. महिलांना अधिक निर्णयक्षम बनविण्यासाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत,असे त्या म्हणाल्या.


