पुणे: ‘द स्मॉल ॲनिमल क्लिनिक’ने एका १३ वर्षीय पाळीव कुत्र्यावर एक दुर्मिळ आणि जगातील पहिली कॅथलॅब एम्बोलिझेशन प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. पारंपारिक शस्त्रक्रियेमुळे जीवघेण्या रक्तस्रावाचा धोका टाळत मफिन झोरे या १३ वर्षीय पाळीव कुत्र्याला नवे आयुष्य मिळाले. मफीन हा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर ॲनिमिया, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, श्वास घेण्यास त्रास आणि यकृत व प्लीहामध्ये मोठ्या कर्करोगाच्या गाठींसारख्या समस्यांनी झुंजत होता
डॉ. नरेंद्र परदेशी(पशुवैद्यकीय सर्जन) यांच्यासह त्यांच्या टिममधील श्रीमती रीना हरिभट आणि अंकिता द्विवेदी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही गुंतागुंतीची प्रक्रिया प्रसिद्ध व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धर्मेश गांधी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कार्डियाक विभागाचे व्यवस्थापक आणि कॅथ लॅब टेक्निशियन श्री. कन्हैया खैरे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
पुण्यात राहणारे सुमीत आणि आरू झोरे यांचा लाडका पाळीव कुत्रा, मफिन झोरे (लॅब्राडोर, नर), याला अत्यंत गंभीर अवस्थेत स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या ४-५ महिन्यांपासून मफिनला पोट फुगण्याची लक्षणे जाणवत होती आणि त्याला उठून बसणे व चालण्यास त्रास होत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच तो खूपच अशक्त झाला होता आणि त्याचे रक्त चाचणीचा निकाल पाहता हिमोग्लोबिन केवळ ३.५ mg/dl आणि प्लेटलेटची संख्या ३०,००० इतकी कमी होती. वैद्यकीय तपासणीत पोटात अंदाजे २.५-३ किलो वजनाची एक मोठी गाठ असल्याचे दिसून आले. अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनसह पुढील तपासण्यांमध्ये प्लीहा आणि यकृतामध्ये मोठ्या गाठी असल्याचे दिसून आले, ही गाठ कँन्सरची असण्याची शक्यता डाँक्टरांनी व्यक्त केला.
पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, मफिनला यकृताच्या गाठीसोबतच प्लीहेची मोठी गाठ असल्याचे निदान झाल्यावर, आम्ही त्याची प्रकृती स्थिर करण्यासाठी आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी त्वरित उपचार सुरू केले. ही स्थिती सामान्यतः वृद्ध कुत्र्यांमध्ये, विशेषतः ज्यांना पूर्वीपासून ‘टिक फिव्हर’चा वैद्यकिय इतिहास आहे, आणि हेमॅन्जिओमा आणि हेमॅन्जिओसारकोमासारख्या प्लीहेच्या गाठींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. या गाठी अनेकदा आक्रमक स्वरूपाच्या असतात ज्यामुळे उपचार करणे आव्हानात्मक ठरते. पारंपारिक पध्दतीचा वापर करत अशा प्रकरणांवर खुल्या पोटाच्या शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जातात, परंतु यकृत आणि प्लीहा हे अत्यंत संवेदनशील अवयव असल्याने, अनियंत्रित रक्तस्त्राव आणि मृत्यूचा धोका खूप अधिक असतो.
मफिनची नाजूक प्रकृती लक्षात घेता आम्ही प्रथम ५५० मिली रक्ताचे रक्त संक्रमण केले, जे संजय पाटील यांच्या एला नावाच्या ५ वर्षांच्या गोल्डन रिट्रीव्हर कुत्रीने दान केले होते. ४८ तासांनंतरही मफिनच्या रक्त तपासणीच्या अहवालात फारशी सुधारणा दिसली नाही. मफिनवर नियमित शस्त्रक्रियेद्वारे ऑपरेशन करणे अत्यंत धोकादायक ठरले असते. त्याचे हिमोग्लोबिन आणि प्लेटलेटची पातळी अतिशय कमी होती आणि या गाठींना रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात होत होता. या टप्प्यावर खुली किंवा लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक होते. यावेळी टिमने एक किमान आक्रमक इंटरव्हेंशनल कॅथलॅब प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जी पशुवैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच करण्यात आली. इंटरव्हेंशनल एम्बोलायझेशन ही एक किमान आक्रमक प्रक्रिया आहे जी खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी रक्तस्त्राव, वेदनेचे प्रमाण कमी आणि बरे होण्याचा कालावधी देखील कमी करते, ज्यामुळे ती उच्च-धोका असलेल्या रुग्णांसाठी ही अधिक सुरक्षित ठरते.
डॉ. परदेशी यांनी पुढे सांगितले की, फेमोरल धमनीद्वारे एक कॅथेटर काळजीपूर्वकरित्या आत टाकण्यात आला आणि यकृताच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांपर्यंत तो पोहोचवण्यात आले. या इंटरव्हेंशनल कॅथलॅब एम्बोलायझेशनमुळे पोटाची शस्त्रक्रिया न करता गाठीचा रक्तपुरवठा खंडित करणे शक्य झाले. यामुळे गाठीचा आकार कमी झाला, अंतर्गत रक्तस्त्राव कमी झाला आणि मफिनच्या शरीराला बरे होण्याची संधी मिळाली. दिवसेंदिवस त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची पाहून आमच्या टिमला अक वेगळेच समाधान लाभले. ही प्रक्रिया पशुवैद्यकीय तसेच मानवी वैद्यकीय तज्ञांमधील सहकार्यामुळे शक्य झाली. सुप्रसिद्ध व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. धर्मेश गांधी आणि डॉ. किरण नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो-कॅथेटर्स वापरून एओर्टिक एम्बोलायझेशन करण्यात आले.
एम्बोलायझेशन प्रक्रियेच्या ४८ तासांच्या आत, मफिनची हिमोग्लोबिन पातळीत वाढ दिसून आली. पंधरा दिवसांनंतर, पाठपुराव्याच्या तपासणीत गाठीचा आकार ७०% पेक्षा अधिक प्रमाणात कमी झाल्याचा दिसून आला. त्याच्या पोटावरील सूज देखील कमी झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मफिन आता सक्रिय जीवनशैली जगत आहे आणि मोकळा श्वास घेत आहे.
द स्मॉल ॲनिमल क्लिनिक, पुणे येथील टीमकडून मफिन लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरा होण्यासाठी शुभेच्छा देतो असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.
मफिन नेहमीच आमच्या कुटुंबाचा एक खेळकर आणि आनंदी सदस्य होता, पण त्याच्या आजारपणाचे निदान झाल्यानंतर, त्याला दिवसेंदिवस अशक्त होताना पाहणे आमच्यासाठी खुपच तणावपूर्ण होते. आज त्याच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून आम्हाला खुप बरे वाटते. या उपचारामुळे मफिन जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमीच कृतज्ञ राहू,अशी प्रतिक्रिया त्याचे पालक सुमित आणि आरू झोरे यांनी व्यक्त केली.
कुत्र्यांमधील इंटरव्हेंशनल ट्यूमर एम्बोलायझेशनबद्दल इंटरव्हेंशनल एम्बोलायझेशन ही एक किमान-आक्रमक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधून कॅथेटरद्वारे गाठींना होणारा रक्तपुरवठा थांबवला जातो. गाठीला रक्तपुरवठा थांबवल्यामुळे, तिचा आकार हळूहळू कमी होतो, रक्तस्त्रावाचा धोका कमी होतो आणि रुग्णांची प्र
कृती स्थिरावते.


