Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंतूर व तबला जुगलबंदीतून शिवजी आणि झाकीरभाईंना अभिवादन*

संतूर व तबला जुगलबंदीतून शिवजी आणि झाकीरभाईंना अभिवादन*

 

 

पुणे, दि. १८ : संतूरच्या हळुवार छेडलेल्या तारा आणि तबल्याचा नाद अशा जुगलबंदीतून ख्यातनाम संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांच्या मैफलीची आठवण करून देणारा स्वरतालाविष्कार रसिकांनी अनुभवला. शर्मा यांचे शिष्य पं. मदन ओक आणि महान तबला वादक उस्ताद अल्लारखा खाँ यांचे शिष्य उस्ताद फजल कुरेशी यांच्या सहवादनाने रसिकांवर स्वरांची मोहिनी घातली. ‘मास्टर्स ऑफ पर्कशन’ या सादरीकरणातून भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचा सुंदर मिलाफ रसिकांनी अनुभवला.

 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील शततंत्री मीडिया यांच्या वतीने पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना तिहाई महोत्सवातून सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात शनिवारी सायंकाळी ही मैफल रंगली. या कार्यक्रमाची संकल्पना पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि प्रसिद्ध संतूर वादत पं. मदन ओक यांची होती.

 

पं. ओक यांनी हळुवार वादनातून यमन राग खुलवला आणि उस्ताद कुरेशी यांनी तबला साथीतून संतूरवरील यमनचे सौंदर्य वाढवले. संतूर आणि तबल्याच्या या जुगलबंदीने शिवजी आणि झाकीरभाईंच्या मैफलीची आठवण ताजी झाली. ओक आणि कुरेशी यांच्या वादनातून शिवजी आणि झाकीरभाईंच्या वादनाची झलक रसिकांनी अनुभवली. या दोन प्रतिभावान कलावंतांनी नक्कल टाळून वारसा पुढे नेणारे सादरीकरण केले. विलंबित आणि नंतर द्रुत तीनतालात झालेल्या ‘तिहाई’ला रसिकांनी दाद दिली. दादरा तालातील पहाडी धून संपूच नये, अशी रसिकांची भावअवस्था झाली होती.

 

उत्तरार्धात ‘मास्टर्स ऑफ पर्कशन’ ही मैफल रंगली. दिलशाद खाँ यांनी सायंकाळच्या कातरवेळी सारंगीतून गोरख कल्याण राग खुलवला. सारंगीच्या लेहरा साथीने उस्ताद कुरेशी यांच्या तबला वादनाचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. राजस्थानच्या मातीतील खरताल या लोकवाद्याचे अद्भुत वादन खेटे खान आणि जाकीर खान या पितापुत्रांनी सादर केले. अनंतकृष्णन (मृदुंग) आणि जॉय रूमडे (तालवाद्य) यांच्या साथीने मैफलीत रंग भरले. या वाद्यमेळ्याच्या एकत्रित आविष्काराने भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचा अद्भुत मिलाफ घडला. पं. संजीव अभ्यंकर, पं. रघुनंदन पणशीकर आणि उस्ताद शाहीद परवेझ यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. राहुल सोलापूरकर यांनी खुमासदार निवेदनातून मैफल रंगवली. पं. रामदास पळसुले, गोविंद बेडेकर, धनंजय गोखले, धनंजय दैठणकर, मंजूषा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

‘भारतीय संस्कृतीचा सांगीतिक अनमोल वारसा जगभरात पोहोचावा, या उद्देशाने २०१४ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधून सुरू झालेला हा प्रवास आता माझ्या मायभूमीत, म्हणजेच पुण्यातून भारतात पदार्पण करीत आहे. पुण्यातील मैफलीनंतर विविध शहरांत हा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा आहे,’ असे पं. मदन ओक यांनी सांगितले.

———-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments