पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२३ :- महापालिकेच्या वतीने शहरात सुसज्ज अशी रुग्णालये तसेच पायाभूत आणि आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधा शहरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम शहर आरोग्य कृती आराखडा विकास कार्यशाळेतून यशस्वी होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केला.
शहर आरोग्य कृती आराखडा विकास अंतर्गत महापालिका आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंजवडी येथील लेमन ट्री हॉटेल येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे बोलत होते.
या कार्यशाळेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, युनिसेफच्या शहरी सल्लागार देविका देशमुख, आरोग्य सल्लागार डॉ. मंगेश गधरी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित सांगडे, डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ. विकल्प भोई, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, डॉ. वैशाली भामरे, डॉ. छाया शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. सय्यद अल्वी, डॉ. रवींद्र मंडपे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. संगिता तिरूमणी, डॉ. तृप्ती सागळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे, पी. एच. एन अनुपम वेले, यशस्विता बाणखेले, सल्लागार डॉ. जयदीप पुरोहित, आशा स्वयंसेविका सुनिता गव्हार, अश्विनी मखरे आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असून महापालिकेस विविध पुरस्कारही भेटले आहेत. नवी दिशा, झोपडपट्टी शून्य कचरा व्यवस्थापन यांसारखे महत्वाकांक्षी उपक्रम महापालिका राबवित आहे आणि नागरिकांचाही या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग आणि शहर पातळीवरील आरोग्य कृती आराखडा तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवड करण्यात आली असून त्यासाठी प्रभागनिहाय विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युनिसेफ संस्थेशी समन्वय साधून काम करावे जेणेकरून शहरातील विविध समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल, असेही अतिरिक्त आयुक्त खोराटे यावेळी म्हणाले.
या कार्यशाळेत प्रभाग आरोग्य कृती आराखडा अंमलबजावणीमध्ये येणारी आव्हाने, खाजगी व्यावसायिकांचा सहभाग, भागीदारीसाठी येणाऱ्या संधी, समुदाय तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग, सेवा वितरण, आशा सेविकांचे प्रशिक्षण तसेच त्यांना येणारी आव्हाने किंवा अडचणी, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिनदर्शिका, गर्भधारणेच्या अत्याधुनिक सुविधा, लहान मुलांचे आरोग्य, स्वच्छतेची गुणवत्तावाढ, झोपडपट्टीमध्ये २४x७ पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल, घनकचरा व्यवस्थापन, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्य शासनामार्फत प्रत्येक महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राने प्रदान केलेल्या रचनेनुसार आरोग्य कृती योजना आराखडा तयार करण्यासाठी विविध उपाययोजनांवर काम करावे व महानगरपालिका स्तरावर शहर आरोग्य कृती आराखडा विकासासाठी युनिसेफ या संस्थेचे सहकार्य घ्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रासाठी प्रभाग आणि शहर आरोग्य कृती आराखडा तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आलेली असून महापालिकेच्या वतीने शहर आरोग्य कृती आराखड्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भविष्यात मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून वापरण्यात येणार आहेत. त्यानुसार युनिसेफ आणि यशदा या संस्थांची मदत घेवून वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन करून वैद्यकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन युनिसेफचे सल्लागार आनंद घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी मानले.