Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे*      ...

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे*                                                       – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी*

 

 

*अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

 

नवी मुंबई, दि. ११ (विमाका) : ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून परस्पर समन्वयाने काम करावे आणि कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततापूर्ण पद्धतीने पार पाडावा, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज कोकण विभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सूर्यवंशी बोलत होते.

या बैठकीस सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व सुनील पवार, राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई ग्रामीण व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे याबैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती उपक्रम, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचारासाठी होर्डिंग व बॅनरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ‘हिंद दी चादर’ विषयावरील माहितीपट, चित्रपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमस्थळी अग्निशमन विभागामार्फत फायर ऑडिट करणे, पिण्याच्या पाण्याची व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करणे, भाविकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करत, हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व विभागांनी दक्षता, समन्वय आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments