Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedउल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २९ मार्च रोजी मूल्यमापन चाचणी*

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २९ मार्च रोजी मूल्यमापन चाचणी*

 

पुणे, दि. १३: केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित राहू न शकलेल्या व कामगिरीत सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

 

राज्यात अंदाजे ३ लाख असाक्षरांची चाचणी घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१६.५ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (४९.५ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत.

 

परीक्षेस जाताना एक आयकार्ड आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांगांसाठी ६० मिनीटांची अधिकची वेळ असेल.

 

ही चाचणी परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली इत्यादी माध्यमातून होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी फक्त काळ्या अथवा निळ्या शाईचा बॉलपेन वापरावा. उल्लास ॲपवर नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती परीक्षेसाठी पात्र असेल. नोंदणी न केलेल्या असाक्षरांसाठी परीक्षा केंद्रावर नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २९ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments