Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedतरुण रुग्णातील दुर्मीळ ‘सिग्मॉइड व्हॉल्व्युलस’वर यशस्वी शस्त्रक्रिया आपत्कालीन सिग्मॉइड कोलेक्टॉमीद्वारे आतड्यांची सलगता...

तरुण रुग्णातील दुर्मीळ ‘सिग्मॉइड व्हॉल्व्युलस’वर यशस्वी शस्त्रक्रिया आपत्कालीन सिग्मॉइड कोलेक्टॉमीद्वारे आतड्यांची सलगता पुनर्स्थापित

पुणे : मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे १७ वर्षीय तरुणीवरील दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाच्या सिग्मॉइड व्हॉल्व्युलस या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या मोठ्या आतड्यांमधील अडथळा दूर करण्यात आला आणि आतड्यांची नैसर्गिक सलगता पुन्हा प्रस्थापित करण्यात आली.

सदर रुग्ण चार दिवसांपासून पोटदुखी, उलट्या, बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा या तक्रारींनी त्रस्त होती. तिला तीन दिवसांपासून वायूही पास होत नव्हता आणि पोटात सतत अस्वस्थता जाणवत होती. यापूर्वी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र अपेक्षित आराम न मिळाल्याने पुढील उपचारांसाठी तिला मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे रेफर करण्यात आले.

तपासणीदरम्यान मोठ्या आतड्यात अडथळा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पुढील तपासण्या, एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये सिग्मॉइड व्हॉल्व्युलस असल्याचे स्पष्ट झाले. या अवस्थेत सिग्मॉइड कोलन त्याच्या मेसेन्टरीभोवती १८० ते ३६० अंशांनी वळतो, ज्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तपुरवठाही धोक्यात येऊ शकतो.

साधारणपणे अशा परिस्थितीत प्रभावित आतड्याचा भाग काढून टाकून तात्पुरती कोलोस्टॉमी करावी लागते. मात्र रुग्णाचे कमी वय आणि ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या टीमने वेगळा निर्णय घेतला.

शस्त्रक्रिया प्रक्रिया :
डॉ. हर्षल राजेकर आणि त्यांच्या शस्त्रक्रिया टीमने एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमीसह सिग्मॉइड कोलेक्टॉमी केली. शस्त्रक्रियेदरम्यान वळलेला सिग्मॉइड कोलन ओळखून तो काढण्यात आला. त्यानंतर कोलोस्टॉमी न करता आतड्यांचे दोन्ही टोक प्रायमरी एंड-टू-एंड अ‍ॅनास्टोमोसिस पद्धतीने जोडण्यात आले. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या नाजूक असली तरी अत्यंत काळजीपूर्वक ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहिली आणि तिला आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही. काही दिवसांत आतड्यांची कार्यक्षमता हळूहळू पूर्ववत झाली आणि रुग्णाने आहारही व्यवस्थित घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला स्थिर प्रकृतीत घरी सोडण्यात आले.

याबाबत माहिती देताना डॉ. हर्षल राजेकर (एमएस, एमआरसीएस, डीएनबी, एफआयएजीईएस), वरिष्ठ सल्लागार – हेपॅटोबिलिअरी व ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी यांनी सांगितले की, तरुण रुग्णांमध्ये सिग्मॉइड व्हॉल्व्युलस हा आजार अत्यंत दुर्मीळ असतो. योग्य वेळी निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. निवडक रुग्णांमध्ये प्रायमरी अ‍ॅनास्टोमोसिस केल्यामुळे कोलोस्टॉमी टाळता येते आणि रुग्णाच्या जीवनमानात मोठी सुधारणा होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments