पुणे, दि. २३: पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.
या कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे, वाद्ये, ढोल, ताशे वाजविणे तसेच गडावर नेण्यास मनाई करण्यात येत आहे. एकाच प्रकार व रंगाची कपडे, वेशभुषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरी, पशु, पक्षी यांचा बळी न देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्लालेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तू व शिल्पांना हानी न पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


