पुणे, दि.२३ मार्च २०२६ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनने (बीएनसीए) नुकतेच नॅशनल असोसिएशन ऑफ स्टूडंट्स ऑफ आर्किटेक्चर (नासा, इंडिया) तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र पातळीवरील प्रदर्शनातील सादरीकरण स्पर्धेत शैक्षणिक विषयावरील सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार पटकावला.
हे सादरीकरण ‘नासा’ इंडियाच्या विभाग तीन मधील वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) महाविद्यालयांसाठी आयोजित केले आहे. हे सादरीकरण बीएनसीएतील तिसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या मोहिनी मांडके आणि चौथ्या वर्षातील अनन्या समनपुरे या विद्यार्थिनींनी केले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी या पुरस्काराबद्दल सहभागी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. तर महाविद्यालयातील ‘नासा’ विभागप्रमूख प्रा. महेश बांगड यांनी आनंद व्यक्त केला.
‘नासा’ इंडियाच्या या स्पर्धेत पुण्यातील ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने विशेष पुरस्कार मिळवला. तसेच या स्पर्धेतील महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील दस्तावेजीकरण या विषयावरील प्रदर्शनाच्या सादरीकरणात कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार मिळवला.
‘नासा’तर्फे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत्या २५ मार्चपर्यंत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये नागरिकांसाठी खुले ठेवण्यात
आले आहे.


