पुणे, दि. २५ मार्च : भारतीय सैन्यदलातील अधिकारी पदासाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या तयारीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक येथील प्री-ट्रेनिंग सेंटर, नाशिक रोड येथे दि. ०४ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना विनामूल्य प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एसएसबी-६५ कोर्ससाठी अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्या दोन प्रती सादर करणे आवश्यक आहे.
एसएसबी प्रशिक्षणासाठी पात्रता निकषानुसार उमेदवारांनी CDSE (UPSC) किंवा NDA (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता मिळालेली असावी. तसेच एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी, तांत्रिक पदवीधर किंवा विद्यापीठ प्रवेश योजनेअंतर्गत (UES) अर्ज केलेल्या उमेदवारांनाही एसएसबी कॉल लेटर असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण विभागाशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच मोबाईल क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांनी केले आहे.


