पुणे, दि. २५ मार्च २०२६
राज्यातील निरक्षर व्यक्तींमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत येत्या रविवारी, दि. २९ मार्च २०२६ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) घेण्यात येणार आहे.
ही चाचणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार असून, परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांग व्यक्तींना अतिरिक्त ६० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
या चाचणीद्वारे वाचन, लेखन व संख्याज्ञान या तीन घटकांमध्ये प्रत्येकी ५० गुणांसह एकूण १५० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात किमान ३३ टक्के गुण आवश्यक राहतील.
सदर परीक्षा मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ व बंगाली या भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित स्वरूपात दिली जाईल.
उल्लास अॅपवर नोंदणी केलेल्या असाक्षर व्यक्तींना परीक्षेस पात्रता राहणार असून, नोंदणी नसल्यास चाचणीच्या दिवशीही नोंदणी करून परीक्षा देता येणार आहे. परीक्षेस येताना उमेदवारांनी स्वतःचा फोटो व ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
राज्यात सुमारे ३ लाख असाक्षर व्यक्ती ही चाचणी देणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे. संबंधित सर्वांनी नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


