मुंबई, 27 एप्रिल 2026 : नाशिक–निफाड–येवला–वैजापूर–औरंगाबाद या राज्य महामार्ग क्रमांक दोनवरील ५६ किलोमीटर टप्प्याच्या रुंदीकरणात अम्मान इंडिया या कंपनीने ‘एल्बा सीसी१५० काँक्रीट बॅचिंग प्लांट्स’चा यशस्वी वापर केला. याबाबतची घोषणा कंपनीने आज केली. हा प्रकल्प महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) ‘ईपीसी-५९’ या ब्राऊनफील्ड प्रकल्पांतर्गत विकसित केला जात आहे. सध्या हा दोन मार्गिकांचा रस्ता आहे. तो चार मार्गिकांपर्यंत रुंद करण्यात येत आहे, तसेच डांबरी रस्त्याऐवजी तिथे कठीण काँक्रीट रस्ता तयार केला जात आहे.
सुमारे ५६० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी जीएचव्ही (इंडिया) प्रा. लि. या कंपनीने एसबी देशमुख आणि फोरकॉन इन्फ्रा प्रा. लि. यांच्या संयुक्त भागीदारीत केली. या कामासाठी ‘अम्मान’ने पुरवलेले ‘एल्बा सीसी१५० बॅचिंग प्लांट्स’ वापरण्यात आले असून, ते नाशिकस्थित ब्रह्मगिरी इन्फ्रा एलएलपी या कंपनीने प्रकल्पस्थळी उभारले आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत ‘अम्मान इंडिया’ने पुरवलेले दोन ‘एल्बा सीसी१५० काँक्रीट बॅचिंग प्लांट्स’ महत्त्वाचे ठरले. ३ जुलै २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या या प्लांट्सनी संपूर्ण ५६ किमीच्या पट्ट्यासाठी एकमेव बॅचिंग व्यवस्था म्हणून काम केले. प्रत्येक प्लांटची उत्पादन क्षमता ताशी १३० घनमीटर होती. दोन्ही प्लांट्समधून मिळून सुमारे १,६५,००० घनमीटर काँक्रीट तयार करण्यात आले. यामध्ये ड्राय लीन काँक्रीट (डीएलसी), पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीट (पीक्यूसी) तसेच एम-१० ते एम-३० या स्ट्रक्चरल ग्रेड्सचा समावेश होता.
मर्यादित जागा, सतत सुरू असलेली वाहतूक आणि टप्प्याटप्प्याने होणारे काम अशा अडचणी असलेल्या ब्राउनफिल्ड प्रकल्पांमध्ये उच्च क्षमतेच्या बॅचिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो, हे या प्रकल्पातून दिसून आले. ‘एल्बा सीसी१५० प्लांट्स’मुळे उत्पादन अखंडपणे सुरू ठेवणे, साहित्याचे अचूक नियंत्रण आणि एकसमान दर्जाचे काँक्रीट मिळणे शक्य झाले. अतिशय व्यग्र अशा वेळापत्रकात टिकाऊ काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरले.
या प्लांटमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या दगड-खडी आणि वाळूसाठी स्वतंत्र साठवण विभाग ठेवण्यात आले होते. तसेच सिमेंट आणि जीजीबीएस (काँक्रीट अधिक टिकाऊ व पर्यावरणपूरक बनवणारे साहित्य) साठवण्यासाठी मोठे ‘सायलो’ बसवण्यात आले होते. प्लांटमध्ये साहित्य सुरळीतपणे पुढे नेण्यासाठी स्वयंचलित प्रणाली वापरण्यात आली, त्यामुळे विलंब टाळला गेला आणि उत्पादन सतत सुरू ठेवणे शक्य झाले.
‘पीडब्ल्यूडी’ने मंजुरी दिलेल्या ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅगच्या (जीजीबीएस) वापरामुळे काँक्रीट निर्मिती अधिक शाश्वत झाली आणि प्रदूषण नियंत्रणालाही मदत झाली.
या प्रकल्पाबाबत बोलताना ‘अम्मान इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक धीरज पांडा म्हणाले, “दीर्घकाळ टिकणाऱ्या काँक्रीट रस्त्यांकडे भारताचा होत असलेला कल या प्रकल्पातून दिसून येतो. विशेषतः ब्राउनफिल्ड परिस्थितीत उच्च दर्जाचे काँक्रीट सातत्याने व मोठ्या प्रमाणावर पुरवण्याची क्षमता आवश्यक असते, ती येथे अत्यंत महत्त्वाची ठरली. प्रगत बॅचिंग तंत्रज्ञानामुळे बांधकाम प्रक्रिया अधिक सुलभ होत असून, रस्त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा सुधारता येतो, हे ‘एल्बा सीसी१५० प्लांट्स’ने दाखवून दिले.”
नव्या सुधारित महामार्गामुळे नाशिक, येवला आणि छत्रपती संभाजीनगर यांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग मराठवाडा आणि विदर्भ भागांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी कॉरिडॉर ठरेल. त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि प्रादेशिक संपर्क अधिक सुधारेल.


