Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमणक्याजवळील दुर्मिळ हाडांच्या वाढीमुळे शिरेवर दाब; मणिपाल हॉस्पिटल बाणेरमध्ये बहुविभागीय जटिल

मणक्याजवळील दुर्मिळ हाडांच्या वाढीमुळे शिरेवर दाब; मणिपाल हॉस्पिटल बाणेरमध्ये बहुविभागीय जटिल

वेळेवर निदान आणि शस्त्रक्रियेमुळे सबक्लेवियन शिरेवरील दाबामुळे झालेली वरच्या हाताची तीव्र सूज कमी

पुणे, एप्रिल २०२६: मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथील ऑर्थोपेडिक सर्जनांनी ४५ वर्षीय पुरुष रुग्णावर यशस्वी उपचार केले. रुग्णाच्या उजव्या वरच्या हातात तीव्र सूज आणि ताण जाणवत होता. यामागील कारण म्हणजे हाडांच्या असामान्य वाढीमुळे प्रमुख शिरेवर आलेला दुर्मिळ प्रकारचा दाब होय. सुरुवातीला ही स्थिती डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT) असल्याचे वाटत होते; मात्र पुढील तपासणीत ही एक गुंतागुंतीची रक्तवाहिनीसंबंधित समस्या असल्याचे स्पष्ट झाले, ज्यासाठी प्रगत शस्त्रक्रियेची आवश्यकता होती.

रुग्णाला सप्टेंबर २०२५ पासून उजव्या हातात तीव्र सूज जाणवत होती आणि सुरुवातीला त्याच्यावर सोलापूर येथे उपचार करण्यात आले. मात्र वेदना आणि अस्वस्थता कायम राहिल्यामुळे त्यांनी पुढील उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे दाखल झाले. प्राथमिक डॉप्लर तपासणीत उजव्या वरच्या हातातील प्रमुख शिरांमध्ये तीव्र रक्तगाठी आढळल्या, तर सीटी व्हेनोग्राफीमध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये पूर्ण अडथळा असल्याचे दिसून आले. मेकॅनिकल थ्रॉम्बस अ‍ॅस्पिरेशनद्वारे गाठ काढण्यात आली; मात्र लक्षणे कायम राहिल्यामुळे मूळ कारण शोधण्यासाठी अधिक सखोल तपासण्या करण्यात आल्या.

या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. श्रीकांत मडीकट्टू, कन्सल्टंट – ऑर्थोपेडिक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर म्हणाले, “सीटी स्कॅनद्वारे पुढील तपासणीत उजव्या बाजूच्या कॉलर बोनच्या (क्लॅव्हिकल) आतील भागात अतिरिक्त हाडांची असामान्य वाढ आढळली. ही वाढ उजव्या हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांवर दाब टाकत होती, ज्यामुळे शिरांमधील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन लक्षणे दिसत होती.”

ते पुढे म्हणाले, “प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जन यांचा समावेश असलेली बहुविभागीय टीम तयार करण्यात आली. दाब निर्माण करणारे अतिरिक्त हाड काढण्यासाठी शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. सुप्राक्लॅव्हिक्युलर पद्धतीने सबक्लेवियन शिरेला काळजीपूर्वक उघडून सुरक्षित ठेवण्यात आले. क्लॅव्हिकलवर डबल-लेव्हल ऑस्टिओटॉमी करून संबंधित भागापर्यंत पोहोचण्यात आले आणि अतिरिक्त हाड काढून टाकण्यात आले. त्यानंतर क्लॅव्हिकल योग्य स्थितीत ठेवून प्लेटच्या मदतीने स्थिर करण्यात आले.”

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती. क्लॅव्हिकल आणि मान परिसरात थोडी सूज होती, जी योग्य औषधोपचार आणि DVT प्रतिबंधक उपायांनी नियंत्रणात आणण्यात आली. या उपचारामुळे शिरेवरील सुमारे ९० टक्के दाब कमी झाला आणि रुग्णाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवसांत रुग्णाला स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला.

या प्रकरणावर वेळेत उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण विलंब झाल्यास अतिरिक्त हाडामुळे प्रमुख शिरांना छिद्र पडण्याचा धोका निर्माण होऊ शकत होता.

ही शस्त्रक्रिया डॉ. श्रीकांत मडीकट्टू, कन्सल्टंट – ऑर्थोपेडिक, मणिपाल हॉस्पिटल, डॉ. श्रीरंग रानडे, कन्सल्टंट कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जन, तसेच डॉ. अभिजित जोशी, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक क्लिनिकल आणि सर्जिकल टीमच्या सहकार्याने पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments