Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआपला देह भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करावा हभप श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर...

आपला देह भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करावा हभप श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांचे विचारः रामेश्वर रुई येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व शिवशक्ती अनुष्ठान यज्ञ सोहळा संपन्न

लातूर, २८ एप्रिल ः”भगवंताचे नामचिंतन घेतले तर ते स्थान पवित्र होते. चांगल्या जागेत सकारात्मक संकल्प सतत येत असतात. त्यामुळे हा देह भगवंताच्या सेवेसाठी अर्पीत करावा. जेथे संतांचे स्थान असते. तेथे भगवंताचे अधिष्ठान असते. तिथली माती सुद्धा पवित्र होते. आज विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची वास्तू हे सर्व विश्वाचे कल्याण करेल.” असे मौलीक विचार हभप श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे व समस्त गावकरी मंडळ रामेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह आणि विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची वास्तुशांती होम हवन आणि अध्यात्मिक ऊनुष्ठानाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप हभप श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ राहुल विश्वनाथ कराड हे होते. हा संपूर्ण सप्ताह विश्वधर्मी प्रा.डॉ विश्वनाथ दा कराड यांच्या आर्शीवादाने आणि मार्गदर्शनात यशस्वीरित्या पूर्ण झाला.
यावेळी रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, आमदार रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, कमल राजेखाँ, राजेश कराड, सरपंच सचिन कराड व रामेश्वरच्या पंचक्रोशितील भाविक उपस्थित होते.
तानाजी पांचाळ यांच्या पुढाकाराने या सप्ताहात मुस्लिम मुलांनी सात ही दिवस विष्णुसहस्त्र नाम, मधुराष्टकम, भगवतगीतेतील १५ वा अध्याय, श्री पांडुरंग अष्टकम आणि पसायदान यांचे पठण हे सर्वात विशेष बाब होती.
हभप श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर म्हणाले,” नामचिंतनात शक्ती असते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण सतत करावे. संकल्पांना सत्यात पूर्ण करण्याचे कार्य संतांच्या हस्ते होत असते. जन्म देणारी भूमी आणि माता ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राज्यात वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. त्यातच कराड घराण्यात ही संस्कृती तयार झाली. प्रत्येक व्यक्तीची नाळ ही गावाशी जुळली जावी. आज रामेश्वर गावाचे नाव संपूर्ण जगभरात मानवतेचा व विश्वशांतीचा संदेश देणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. २१ व्या शतकात भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखवेल. तसेच ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. त्याची सुरूवात रामेश्वर या गावातून झाली आहे.”
रमेश अप्पा कराड म्हणाले, “ज्या गावात संप्रदाय वाढतो, त्या गावात एकी निर्माण हाते. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाने राम मंदिर, दर्गा मस्जिद, बुद्ध विहार, राम-रहिम सेतू, गोपाळबुवा मंदिर आणि विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन उभारले गेले आहे. त्यामुळे गावाचे स्वरूप बदलले आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोग सहभागी झाले आहेत, हे अभिमानस्पद आहे.”
डॉ.मंगेश तु. कराड म्हणाले,” आपली जन्म भूमी स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे. गाव आणि समाज बदलत चालला आहे. या बदलेल्या काळात हरिनाम सप्ताहाचे आयोजन अतिशय महत्वाचे आहे. गावातील प्रत्येकाचे नाते हे या मातीशी जुळलेले आहे. गावातील सर्वांना एकत्रित आणणे हे सर्वात महत्वाचे आहे.”
राजेश कराड म्हणाले,” मानवतातीर्थ भवन हे अद्वितीय आहे. ज्याची निर्मिती विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली आहे. रामेश्वर येथील प्रत्येक जाती धर्माची व्यक्ती येथे उपस्थित आहे. हे जगातील एकमेव उदाहरण आहे. सर्वांना प्रेरणा देणारी ही वास्तू आहे.”
रामेश्वर येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व शिवशक्ती अनुष्ठान यज्ञ सोहळा संपन्न झाला. या वेळी रामेश्वरच्या पंचक्रोशितील भाविक भक्त आणि माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सात दिवस चाललेल्या या सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाने झाली.
संपूर्ण सप्ताहात हभप बाबा महाराज बोराडे, हभप प्रभाकर नाना महाराज, महादेव महाराज बोराडे, भगवान महाराज कराड, अप्पा महाराज चौरे, जगन्नाथ महाराज सांगळे आणि बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांचे किर्तन झाले.
हभप शालिकराम खंदारे यांनी प्रास्ताविक केले.
या सोहळ्यासाठी राजेश कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments