Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना*

*उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना*

पुणे, दि. 29 (जि.मा.का.): सध्या राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता असून पशुधनाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पशुधनामध्ये उष्माघात, दूध उत्पादनात घट, भूक मंदावणे, निर्जलीकरण तसेच मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने पशुधन संरक्षणासाठी पशुपालकांनी करावयाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे.

जनावरांना दिवसभर मुबलक प्रमाणात स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या टाक्या व पाणवठे स्वच्छ ठेवावेत. शक्य असल्यास पाण्यात इलेक्ट्रोलाइट / खनिज मिश्रणाचा वापर करावा. सावलीची व्यवस्था जनावरांना थेट उन्हात बांधू नये. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करावा. गोठ्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आहार व्यवस्थापन सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. खनिज मिश्रण व मीठाचा संतुलित वापर करावा.

जनावरांना थंडावा देणे- दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. म्हैस व इतर जनावरांना पाण्यात बसण्याची व्यवस्था असल्यास अधिक चांगले. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराच्या हालचाली शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी कराव्यात.

धाप लागणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती व अशक्तपणा, खाद्य व पाणी कमी घेणे आदि लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

कुक्कुटपालनासाठी विशेष काळजी- शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे. स्वच्छ व थंड पाणी सतत उपलब्ध ठेवावे. गर्दी टाळावी व इलेक्ट्रोलाइटचा वापर करावा.

*उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी व वरील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त, डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.*
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments