Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्ट मॅजिक चित्र प्रदर्शन रविवार पासून (दि.१७) आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे...

आर्ट मॅजिक चित्र प्रदर्शन रविवार पासून (दि.१७) आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे आयोजन : प्रदर्शनाचे १९ वे वर्ष

 

 

पुणे : आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२६” या १९ व्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार दि. १७ मे ते मंगळवार दि. १९ मे २०२६ दरम्यान बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दि. १७ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.

 

या प्रदर्शनाच्या आयोजिका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकार महालक्ष्मी भालचंद्र पवार असून सहआयोजक अंबादास भालचंद्र पवार आहेत. मागील अनेक वर्षांपासून महालक्ष्मी पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले आहे. महालक्ष्मी पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राजस्थान सरकारने कलागौरव पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

 

प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. तसेच प्रसिद्ध चित्रकार मलिकार्जुन सी. सिंदगी व सुनील सोनावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

प्रदर्शनात सुमारे ६० विद्यार्थ्यांच्या १८० हून अधिक कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. वयाच्या ३ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तसेच हौशी चित्रकारांनी यात सहभाग घेतला आहे. कलर पेन्सिल, पोस्टर कलर, अॅक्रेलिक, ऑइल पेंटिंग, थ्रीडी पेन, चारकोल आदी विविध माध्यमांतील कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती व कलागुणांना वाव देणे हा आहे. मोबाईलचा अतिवापर कमी करून मुलांना कलेच्या माध्यमातून सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात येत आहे. तसेच कला व डिझाईनच्या माध्यमातून शालेय उपयोगी वस्तूंची निर्मिती कशी करता येते, याचाही अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

 

रविवारी दुपारी ३ वाजता वंचित विकास संस्था व अभिरुची वर्गातील मुलांसाठी विशेष कलास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे मार्गदर्शन सारिका उबाळे करणार आहेत. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments