भारती एअरटेल लिमिटेडने मार्च 2026 अखेरच्या चौथ्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली. कंपनीचा एकत्रित महसूल 55,383 कोटी रुपये झाला असून त्यात वार्षिक 15.7 टक्के वाढ झाली आहे. भारतातील मोबाईल व्यवसायात चांगली वाढ झाली असून एआरपीयू 257 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय, कंपनीने या तिमाहीत 2,426 नवीन टॉवर्स आणि 16,746 मोबाईल ब्रॉडबँड बेस स्टेशन उभारले. तसेच एअरटेलने 65 कोटी ग्राहकांचा टप्पा पार करत जगातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन गोपाल विट्ठल यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2026 हे एअरटेलसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरले. कंपनीने डेटा सेंटर व्यवसायाचा विस्तार केला असून डिजिटल फायनान्स, क्लाऊड सेवा आणि एआय तंत्रज्ञान क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. भविष्यात मजबूत डिजिटल नेटवर्क उभारणी आणि स्वच्छ ऊर्जेवर कंपनीचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील मोबाईल व्यवसायात 58 लाख नवीन स्मार्टफोन ग्राहक आणि 8 लाख पोस्टपेड ग्राहकांची भर पडली आहे. होम्स, आयपीटीव्ही आणि एअरटेल व्यवसाय विभागातही चांगली वाढ झाली. भविष्यातील गुंतवणूक आणि दीर्घकालीन वाढीसाठी टॅरिफमध्ये आणखी सुधारणा होणे आवश्यक असल्याचे मतही गोपाल विट्ठल यांनी व्यक्त केले.


