पुणे, दि. १५ (जिमाका,वृत्तसेवा) : शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विविध पदांसाठी उसनवारी तत्वावर शिक्षक व अधिकारी संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
हा कार्यक्रम राज्यातील १५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय सेवेत कार्यरत शिक्षक, उपशिक्षणाधिकारी किंवा तत्सम गट-ब पदावरील अधिकारी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच तत्सम पदांवरील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी गुगल लिंक शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून अर्ज भरण्याचा कालावधी १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अनुभव, मुलाखत, सादरीकरण आदी निकषांच्या आधारे नियुक्ती प्रक्रिया संचालनालय स्तरावर राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने कळविले आहे.
000


