‘डी’अव्ह्रिल ड्यु पिनिए या घोड्यावर स्वार होत आशिष लिमये यांनी ‘सीसीआय फोर-एल’ या गटात चौथे स्थान मिळवत जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी मिळवली पात्रता
‘विली बी डन’ या घोड्यावर स्वार होत ‘सीसीआय थ्री-एस’ गटातही चौथ्या स्थानासह आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पात्रता निश्चित
भारतीय अश्वक्रीडापटू आशिष लिमये यांनी पोलंडमधील सोपोट येथे आयोजित प्रतिष्ठित अश्वक्रीडा स्पर्धेत देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी ‘सीसीआय थ्री-एस’ आणि ‘सीसीआय फोर-एल’ या दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
जगातील अव्वल अश्वस्वारांशी स्पर्धा करताना आशिष यांनी ‘डी’अव्ह्रिल ड्यु पिनिए’ या घोड्यावर स्वार होत ‘सीसीआय फोर-एल’ गटात ११ स्पर्धकांमध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आणि वर्ल्ड गेम्ससाठी पात्रता मिळवली. तसेच, ‘सीसीआय थ्री-एस’ गटात ४४ स्पर्धकांमध्ये त्यांनी ‘विली बी डन’ या या घोड्यावर स्वार होत आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीही यशस्वी पात्रता मिळवली.
या कामगिरीमुळे आशिष लिमये यांनी ‘विली बी डन’ या घोड्यावर स्वार होत ‘सीसीआय थ्री-एस’ गटात सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी वैयक्तिक पात्रता मिळवली आहे. तसेच, ‘डी’अव्ह्रिल ड्यु पिनिए’ या दुसऱ्या घोड्यावर स्वार होत त्यांनी ‘सीसीआय फोर-एल’ गटात ऑगस्ट २०२६ मध्ये जर्मनीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इक्वेस्ट्रियन गेम्ससाठीही पात्रता मिळवली आहे.
आशिष लिमये यांच्या प्रवासाला आणि सातत्यपूर्ण यशाला ‘एम्बसी इंटरनॅशनल रायडिंग स्कूल’चे (ईआयआरएस) मोलाचे पाठबळ लाभले आहे. भारतात जागतिक दर्जाचे अश्वक्रीडापटू घडवणे तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे यामध्ये या संस्थेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
या यशाबद्दल बोलताना आशिष लिमये म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना वर्ल्ड गेम्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्हीसाठी पात्रता मिळवणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. सोपोट येथे बलाढ्य आंतरराष्ट्रीय अश्वस्वारांविरुद्ध स्पर्धा करणे हा मोठा शिकण्याचा अनुभव होता. एम्बसी इंटरनॅशनल रायडिंग स्कूल, माझी टीम आणि या प्रवासावर विश्वास ठेवणारे या सर्वांकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
आशिष यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलताना ‘एम्बसी इंटरनॅशनल रायडिंग स्कूल’च्या संचालिका सिल्वा स्टोराय म्हणाल्या, “सोपोटमधील आशिषच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय अश्वक्रीडा क्षेत्रातील भारताची वाढती प्रगती दिसून येते. आशिष यांच्या या यशामुळे देशभरातील नवोदित अश्वस्वारांना प्रेरणा मिळणार असून, भारतीय अश्वक्रीडापटू आता जागतिक स्तरावर अधिक सक्षमपणे स्पर्धा करत असल्याचेही यातून अधोरेखित होते. तसेच सातत्यपूर्ण प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि संस्थात्मक पाठबळ यांचा जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यामध्ये किती मोठा प्रभाव पडतो, हेही या कामगिरीतून स्पष्ट हो
ते.”
—


