Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म : दत्तात्रेय होसबाळे*

पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म : दत्तात्रेय होसबाळे*

 

 

पुणे, दिनांक १६ मे २०२६ ः “हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान येथे आयोजित अनंत आणि पद्मा बिरादार परिवाराच्या स्नेहमिलन व कुटुंब प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर हरीक्षेत्र हरिहर येथील वीरशैव लिंगायत पंचमसाली जगद्गुरु पीठाचे जगद्गुरू वचनानंद महास्वामी उपस्थित होते.

सरकार्यवाह होसबाळे म्हणाले, “व्यक्तिनिर्माण आणि समाज संघटन हा संघाचा मूळ गाभा आहे. परंतु, युगानुकूल समाजपरिवर्तनासाठी संघाने पंचपरिवर्तनाचा विचार मांडला आहे. जन्माच्या आधारावर होणारा भेदभाव हा ईश्वरविरोधी असून, त्याला हिंदू समाजात स्थान नाही; समाजातील अस्पृश्यता संपूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ कायदे करून चालणार नाही, तर ते नित्य संस्कारातून रुजवावे लागेल. नागरिकांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. कुटुंब हे राष्ट्राचे आर्थिक आणि सामाजिक एकक आहे. याच कुटुंबव्यवस्थेमुळे भारताने हजारो वर्षे परकीय आक्रमणांचा यशस्वी सामना केला. मात्र, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.”

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा यायलाच हवी,असा ठाम आग्रह दत्तात्रेय होसबाळे यांनी यावेळी धरला. ते म्हणाले, “भारतातील प्रत्येक भाषेमध्ये जगातील श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झाले आहे. मुलांना परकीय भाषा जरूर शिकवा, परंतु मातृभाषा बोलण्यात कोणताही संकोच नसावा. भाषा आणि संस्कृतीबद्दल केवळ अभिमान बाळगून चालणार नाही, तर ती दैनंदिन आचरणात आणली पाहिजे.”

——–

दत्तात्रेय होसबाळे म्हणाले…

– कुटुंब हा भारताचा प्राण : कुटुंबातूनच राष्ट्र घडते. भौतिक सुविधांमुळे केवळ ‘घर’ बनते, पण ‘कुटुंब’ आत्मीयतेतूनच तयार होते. भारतीय हिंदू जीवनपद्धतीतील कुटुंबव्यवस्थेचे जगभरात कौतुक होते. आज संयुक्त कुटुंब पद्धती कदाचित व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसेल, पण कुटुंबातील परस्पर संबंध, प्रेम आणि आत्मीयता टिकून राहणे महत्त्वाचे आहे.

– सोशल मीडियाचे आव्हान: आज सोशल मीडियाच्या आणि स्वार्थाच्या युगात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे कुटुंब विखुरत चालली आहेत. अशा काळात नव्या पिढीला योग्य संस्कार देणे ही अधिक जबाबदारीचे कार्य झाले आहे. कुटुंबाला केवळ व्यवस्था न बनवता, ते संस्कारांचे केंद्र बनवले पाहिजे.

 

 

बिरादार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित असणाऱ्या संघाच्या प्रचारकांमुळेच मी घडलो. त्यांच्या संपर्कातून प्रेरित होऊन मी समाजकार्य आणि निसर्गोपचार क्षेत्रात काम करू शकलो. संघामुळेच मला कामाप्रती समर्पण, संपर्क-संवाद, परिवारातील सामंजस्य आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार शिकायला मिळाला,” अशी भावना अनंत बिरादार यांनी यावेळी व्यक्त केली. मकरंद टिल्लू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

——

आधी हिंदू, मग लिंगायत : वचनानंद महास्वामी

वैद्यकीय उपचार पद्धतीचे भविष्य हे योग आणि निसर्गोपचारातच आहे, असे सांगून वचनानंद महास्वामी म्हणाले की, “सध्या हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लिंगायत हे सर्वप्रथम हिंदू आहेत आणि नंतर लिंगायत आहेत, हा विचार स्पष्ट झाला पाहिजे.

———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments