मुंबई, महाराष्ट्र: शहरात झालेल्या धक्कादायक घटनाक्रमात १००० कोटींपेक्षा जास्त रूपयांचा पोन्झी घोटाळा उघडकीस आल्यामुळे शेकडो गुंतवणूकदार ओशिवरा पोलिस ठाण्यात जमा झाले आहेत. रित्झ कन्सल्टन्सीचा सीए अंबर दलाल फरार झाला आहे.
काल संध्याकाळी चार्टर्ड अकाऊंटंट अंबर दलाल आणि त्याची कंपनी रित्झ कन्सल्टन्सीविरूद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर जवळपास ९०० गुंतवणुकदारांचा सहभाग असलेला घोटाळा उघड झाला. तो दर महिन्याला २ टक्के परतावा तसेच भांडवलाच्या सुरक्षेची कायदेशीर हमी देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करत असे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आणि ज्येष्ठ नागरिक त्याच्या कंपनीत गुंतवणूक करत असत. गुंतवणूकदारांना मार्च महिन्यात त्यांचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यांनी त्याबाबत चौकशी करण्यास सुरूवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर त्यांना अंबर दलालच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले की, तो १४ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहे. त्यामुळे त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील करत आहेत.


